वरोरा (चंद्रपूर) : मागील काही दिवसांपासून गळ्यात फास घेऊन जंगलात एक वाघीण फिरत आहे. वन विभाग तिला शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. वन विभागाने कॅमेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. तब्बल ४२ कॅमेरे जंगलात लावले आहेत; परंतु ती वाघीण एकाही कॅमेऱ्यात कैद झाली नाही. त्यामुळे वाघिणीच्या जिवाला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सालोरी जंगलातील कक्ष क्रमांक ११ मध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये गळ्यात पट्टा असलेला वाघ आढळून आला. ती मादी असून तिच्या गळ्यात पट्टा नसून शिकारी करता लावण्यात आलेला फास असल्याचे मानले जात आहे. या घटनेला आठपेक्षा अधिक दिवस झाले; पण ती वाघीण पिंजऱ्यामध्ये आली नाही व कॅमेऱ्यामध्येही दिसली नाही. तिला शोधण्याकरिता पन्नासपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी जंगल पिंजून काढत आहेत. जंगलात मोठ्या प्रमाणात पाणी व गवत असल्याने पगमार्कही मिळणे दुरापास्त झाले आहे. यापूर्वी मिळालेल्या पगमार्कवरून ती वयस्क वाघीण असल्याचे मानले जात आहे.
परिसरात शिकारही नाही
गळ्यात फास घेऊन फिरत असलेल्या वाघिणीने जंगल परिसरात व बाहेर शिकार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ती पाणी पीत जगत असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांत वाघिणीने शिकार करून आपली भूक भागवली नाही, तर भुकेने मृत्यू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सहा वर्षांपूर्वी अडवली होती वाट
चिमूर-वरोरा मार्गावरील सालोरी गावानजीक सहा वर्षांपूर्वी २६ जानेवारीला सकाळी हीच वाघीण आपल्या दोन बछड्यांसह रस्ता ओलांडून तलावाकडे जात होती. त्यावेळी २६ जानेवारीच्या कार्यक्रमाला जाणारे काही काळ रस्त्यावरच थांबले होते.
रक्ताच्या डागांबाबत संभ्रम कायम
ज्या परिसरात वाघीण कॅमेऱ्यामध्ये कैद झाली त्याच परिसरात रक्त आढळून आले; परंतु ते रक्त नेमक्या कोणत्या प्राण्याचे आहे याची तपासणी अद्याप झाली नसल्याचे समजते.