चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटक येत असल्याचे पाहून एका व्यक्तीने भार्गवी लॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. नावाने कंपनी स्थापन करून रिसोर्ट कुटी उभारण्याच्या नावावर दरमहा रक्कम देण्याचे आमिष दाखवून १५ जणांना ४१ लाख ५० हजारांना गंडविल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. दुर्गापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरत नानाजी धोटे (रा. तुकूम) असे आरोपीचे नाव आहे.
चंद्रपुरातील तुकूम येथील धांडे हॉस्पिटलसमोरील टोंगे यांच्या घरी राहणाऱ्या आरोपी भरत धोटे याने भार्गवी लॅण्ह डेव्हलपर्स या नावे कंपनी स्थापन करून एजंटद्वारे पद्मापूर येथील १००० चौरस फुटाचा प्लॉट ३० महिन्यांसाठी २ लाख ५० हजारांत भाडेतत्त्वावर घेतला. ही जागा घेतना त्याने युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम लिमिटेडच्या नावाने करार केला. त्यानंतर ज्या प्लॉटवर बांधकाम करून पर्यटकांना रिसोर्टमध्ये ज्या सुविधा मिळतात त्याप्रमाणे भाड्याने देऊन त्यातून मिळणाऱ्या नफ्यातून प्रत्येक प्लॉटधारकाच्या बँक खात्यात ७ हजार ८३ रूपये ३० महिन्यांपर्यंत देण्याचे आमिष दाखविले. शिवाय, ही जागा एप्रिल-मे २०२२ पर्यंत सर्व प्लॉटधारकांच्या नावाने रजिस्ट्री करून देण्यात येईल, अशीही बतावणी केली आणि १५ व्यक्तींकडून धनादेश, आरटीजीएस, फोन पे, गुगल पेद्वारे प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये घेतले. भार्गवी लॅण्ड ॲण्ड डेव्हलपर्सच्या नावाने स्टॅम्पपेपरवर नोटरी करून इसारपत्र व युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रा. लि. नावाने जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये करारनामा करून दिला.
विश्वास संपादन करून फसवणूक
करारनामा केल्यानंतर आरोपी धोटे याने विश्वास संपादन करण्यासाठी तीन ते चार महिने प्लाॅटधारकांच्या बँक खात्यात ७ हजार ८३ रूपये जमा केले. मात्र, त्यानंतर त्याने पैसे देण्यात बंद केले. प्लॉटधारकांनी विचारपूस केली असता, त्यांने उडवाउडवीचे उत्तरे दिली. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्लॉटधारकांनी दुर्गापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून भरत धोटे याच्याविरुद्ध भादंवि ४२०, ४०६, ४५७, ४६८ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केेला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात दुर्गापूर पोलिस करीत आहेत.
दुर्गापूर पोलिसांचे आवाहन
भार्गवी लॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. नावाने कंपनी स्थापन करून प्लॉटधारकांना ४१ लाख ५० हजारांना गंडविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर अशा नागरिकांनी दुर्गापूर ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन ठाणेदार स्वप्निल धुळे यांनी केले.