परिमल डोहणे
चंद्रपूर : कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यामुळे सर्वच बंद पडले. याचा फटका बंदीवानांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. बंदीवानांच्या भेटीगाटीवर न्यायालयाने निर्बंध लादल्याने मागील दहा महिन्यांपासून बंदीवानांना आपल्या कुटुंबीयांची भेटगाठच घेता आली नाही.
देशात कोरोना विषाणूचा पसार होताच सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात २ मे रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. जिल्हा कारागृहातील १७० बंदीवान, २१ अधिकारी व कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे कारागृहातच कोविड रुग्णांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे बंदिवानांच्या नातेवाइकांची भेटीगाठी बंद होत्या. यावेळी आप्तेष्ट व कुटुंबीयांशी वार्तालाप करण्यासाठी मोबाइल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नातेवाइकांच्या भेटीगाठीवरच निर्बंध लादले. त्यामुळे मागील दहा महिन्यांपासून जिल्हा कारागृहात चंद्रपूर व गडचिरोली दोन्ही जिल्ह्यांतील ४२९ पुरुष व १६ महिला बंदिवानाना आपल्या आप्तेष्टांशी भेटगाठ घेतली नाही. केवळ भ्रमणध्वनीद्वारेच वार्तालाप करून आपली खुशहाली कळवावी लागत आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. बंद असलेल्या सर्व शाळा-महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र बंदिवानांच्या भेटीवरील बंदी उठवण्याबाबत अद्याप कसलेच पाऊल उचलले नाही. परिणामी सर्व बंदीवान आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आतुर झाले आहेत.
बॉक्स
व्हिडिओ कॉलिंगद्वारे साधतात नातलगांशी संवाद
बंदीवानानी अर्जामध्ये आपल्या कुटुंबीयांचे नंबर लिहून द्यावे लागते. त्याची शहानिशा झाल्यानंतर बंदीवानांच्या मागणीनुसार व्हिडीओ किंवा ॲाडिओ कॉलिंगद्वारे संपर्क करून दिला जातो. न्यायाधीन बंदिवानांना आठवड्यातून एकदा, तर शिक्षाधीन बंदीवानांना पंधरवड्यातून एकदा कॉलिंगद्वारे बोलण्याची व्यवस्था करून दिली आहे. परंतु, भेटीगाठीवर निर्बंध लादण्यात आले आहे.
बॉक्स
कारागृह प्रशासनाकडून मायेची ऊब
कोरोनामुळे नातेवाइकांच्या भेटीगाठी बंद आहेत. त्यातच चंद्रपुरात कडाक्याची थंडी पडत आहे. परंतु, अनेक बंदिवानांकडे स्वेटर, मफलर किंवा बंदीवानांकडे थंडीपासून बचावाचे साहित्य नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाने बंदिवान व कैद्यांना मायेची ऊब दाखवत थंडीपासून बचावाकरिता ब्लँकेट, चादरची व्यवस्था केली आहे.