भद्रावती : रात्री गस्तीवर असताना आलेल्या निनावी भ्रमनध्वनीच्या आधारे नागपूरकडून येणाऱ्या वाहनांची झडती घेवून तीन वाहनांसोबत ८ आरोपींना ताब्यात घेतले. त्या वाहनात असलेल्या ४९ जनावरांना जीवदान देणारे पोलीस उपनिरीक्षक सुशील धोकटे यांचा आ. बाळू धानोरकर यांनी शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.पोलीस उपनिरीक्षक सुशील धोकटे व शिपाई गौरकर गस्त घालत असताना रात्री अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनी करून माहिती दिली की, नागपूर येथून हेद्राबादकडे जनावरांनी भरलेले दोन ट्रक व एक कार येत असल्याची आहे. या माहितीनुसार, भद्रावती येथील पेट्रोलपंप चौकात वाट पाहात असताना पहाटे ३ वाजता ‘ती’ वाहने दाखल झाली. त्यांना अडवून झडती घेतली असता त्यामध्ये ४९ जनावरे आढळली. त्यातील आठ आरोपींनी पोलीस उपनिरीक्षक धोकटे यांना एक लाख रुपये घेऊन प्रकरण इथेच संपविण्याची विनंती केली होती. परंतु पोलीस उपनिरीक्षक धोकटे यांनी त्याला भिक न घालता आपले कर्तव्य पार पाडले. ही संपूर्ण कारवाई धोकटे यांनी एकठ्या मोठ्या प्रमाणातील ही जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई आहे. हे संपूर्ण जनावरे जैन मंदिर गोशाळा येथे सुपूर्द करण्यात आली. धोकटे यांच्या कार्याची दखल घेवून आ. धानोरकर यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार, भारतीय जनता किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, नगराध्यक्ष धानोरकर, ठाणेदार निकम यांनी त्यांचा सत्कार केला. (शहर प्रतिनिधी)
४९ जनावरांना जीवदान देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार
By admin | Published: April 09, 2017 12:51 AM