लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक पथदिव्यांचे कनेक्शन कापण्यात येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे जीवितहाणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बैठक घेत ग्रामपंचायतींना थकीत वीज बिल भरणा करण्यासाठी यापुढे जिल्हा नियोजन समितीतून ५० टक्के निधी देण्यात येईल, असे सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिंवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे बील यापूर्वी शासनामार्फत भरण्यात येत होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून ५० टक्के थकित वीज बिलाचा भरणा करावा लागणार आहे. उर्वरित भरणा करण्यासाठी ५० टक्के निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यात येईल. काही ठिकाणी ग्रामीण भागातील पथदिवे दिवसभर सर्रासपणे सुरू असतात. त्यामुळे मोठया प्रमाणात वीज बिल येतात. ग्रामीण भागातील पथदिवे किती वाजता सुरू व्हावे व किती वाजता बंद, यासाठी टाइमर सेन्सर लावणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत स्तरावर टायमर सेंसर लावून घ्यावे. असेही यावेळी सांगण्यात आले. ग्रामपंचायतीकडे थकीत असलेल्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी स्त्रोत उपलब्ध असून त्यातून ५० टक्के प्रमाणात सदर ग्रामपंचायतीकडून थकित असलेल्या वीज बिलाचा भरणा करता येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी यावेळी दिली.
वीज पुरवठा खंडित केला जाणार नाहीजिल्हा परिषद सामान्य फंडातून ग्राम पंचायतीच्या पथदिव्यांचे सहा महिन्यांचे वीज बिल भरण्यात येईल आणि जिल्हा विकास फंडातून सहा महिण्यांच्या वीज बिलाचा भरणा करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही, यासाठी कॅबिनेटमध्ये मुद्दा उपस्थित केला आहे. यावर निर्णय होईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी सरपंच, उपसरपंचांना मार्गदर्शन करताना दिली. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गावातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगून यावेळी २ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीमध्ये ग्रंथालय उभारणीसाठी देण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी सरपंच, उपसरपंचाच्या वतीने पथदिव्यांचे वीज कनेक्शन खंडित करू नये, याबाबत निवेदन दिले.
पालकमंत्र्यांनी व्यक्त केला संताप- ग्रामपंचायतीने थकीत वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरणने कनेक्शन कापने सुरु केले आहे. याबाबत पुरेसा वेळ न देता विजेचे कनेक्शन कापल्यामुळे पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला.- ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कापण्यापूर्वी जि.प.मुख्य कार्यकारी अधिका-यांना दोन-तीन दिवसापूर्वी अवगत करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.