चंद्रपूर : विलक्षण स्मरणशक्ती लाभलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील डोंगर हळदी येथील जि. प. शाळेतील सोहन उईके या ध्येयवेड्या बालकाचे नाव राज्यभर व्हायरल झाले. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. मात्र, कौतुकापलीकडे जात ऑफ्रोट (आर्गनाईजेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल) या संघटनेने सोहमच्या पुढील शिक्षणासाठी ५० हजारांची मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. रविवारी (दि. १) २५ हजारांचा धनादेश सोहनला घरी जाऊन प्रदान करण्यात आला.
सोहन उईके हा आठव्या वर्गात शिकत आहे. त्याची शिक्षणाविषयीची आवड, पुढे शिक्षण घेऊन मोठा अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा आणि त्यासाठी मेहनत घेण्याची त्याची तयारी वाखाणण्याजोगी आहे. आय.ए.एस. अधिकारी होण्यासाठी सुनियोजित अभ्यास ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे तो आत्मविश्वासाने सांगतो. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी केलेल्या संवादातूनही हा संदेश सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. सोहनच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचण येऊ नये, याकरीता सामाजिक उत्थानासाठी अग्रेसर ऑफ्रोट फाऊंडेशनचे संचालक ॲड. राजेंद्र मरसकोल्हे, नंदकिशोर कोडापे यांच्या मार्गदर्शनात ५० हजारांची मदत मुदत ठेव म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑफ्रोटचे जिल्हाध्यक्ष विजय कुमरे, सचिव शंकर मडावी, सुनिल गेडाम, पुरुषोत्तम सिडाम यांच्या हस्ते सोहन व त्याच्या पालकाकडे रविवारी डोंगर हळदी येथे घरी जावून २५ हजारांचा प्रदान करण्यात आला. दुसरा धनादेश १० वी झाल्यानंतर देण्यात येणार आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची
सोहनच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे आत्मविश्वास बुलंद असला तरी आर्थिक पाठबळ नसल्याने आजच्या स्पर्धेच्या शिक्षण व्यवस्थेतून यश कसे मिळविणार, याची चिंता ऑफ्रोट फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे आपल्या शक्तीनुसार त्यांनी सोहनला मदतीचा हात दिल्याचे सचिव शंकर मडावी यांनी सांगितले.
"सोहन उईके हा विद्यार्थी खरोखरच बुद्धीमान आहे. भविष्यात तो नक्कीच यशस्वी होईल. त्याचा आत्मविश्वास असाच कायम राहावा व शैक्षणिक वाटचालीसाठी भविष्यातही ऑफ्रोट संघटना पाठीशी राहणार आहे."
- विजय कुमरे, जिल्हाध्यक्ष ऑफ्रोट, चंद्रपूर