चंद्रपूर : ‘सर्वासाठी घरे २०२४’ हे केंद्र व राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या ध्येयपूर्तीसाठी व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामांना गुणवत्तेसह गतिमानता आणण्यासाठी महाआवास अभियान ३.० (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. शिवाय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त अमृत महाआवास अभियान सुरू आहे. या अभियानांची फलश्रुती म्हणून केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ग्रामीण भागात ५३ हजार १३६ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळाला आहे. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३३ हजार ८०५ तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत १९ हजार ३३१ घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन २०१६-१७ ते २०२२-२३ या कालावधीत ४३ हजार ६४६ चे उद्दिष्ट प्राप्त आहे. सर्व घरकुलांना मंजूरी मिळाली. यापैकी ३३ हजार ८०५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. ज्या लाभार्थीकडे स्वत:ची जागा नाही, अशा लाभार्थ्यांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५० हजारपर्यंतचे अनुदान देय आहे. राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्ह्यात रमाई आवास योजनेचे २२८७३ घरकुलांचे उद्दिष्ट असून १८०४९ घरकुलांना मंजूरी देण्यात आली. यापैकी १ हजार ३१७ घरकुल पूर्ण झाली. शबरी आवास योजनेचे उद्दिष्ट १४ हजार ५१६ असून मंजूरी ११२१२ तर पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या ५१३९ आहे.
आदीम आवास योजनेतून ३५६ घरे पूर्ण
जिल्ह्याला आदीम आवास योजनेचे उद्दिष्ट ७२३ आहे. यापैकी ५५६ घरकुलांना मंजूरी मिळाली. ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. पारधी आवास योजनेचे उद्दिष्ट ३५ असून ३२ घरकुलांना मंजूरी आणि १७ घरकुल पूर्ण बांधून झाले. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत २ घरकुल बांधण्यात आले. अशा एकूण राज्य पुरस्कृत विविध योजनांमधून ग्रामीण भागात १९ हजार ३३१ कुटुंबाना हक्काचा निवारा मिळाला आहे.