चंद्रपूर : सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत विविध उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आले. या अभियानांतर्गत वर्षानुवर्षांपासून अतिक्रमित पांदण रस्तेही मोकळे करण्यास प्रशासनाला यश आले आहे. या अभियानातून जिल्ह्यातील तब्बल ५३१ किलोमीटरपर्यंतचे रस्ते मोकळे झाले आहे.शेतरस्ते शेतशिवारात ये-जा करण्यासाठी अतिशय महत्वाचे असते. शेतीच्या विकासात मोलाचा हातभार लावणाऱ्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पांदण रस्त्यावर वर्षानुवर्षे अतिक्रमण होते. या रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आल्याने त्याचा शेतकरी, शेतमजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे हे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. सुवर्णजयंती राजस्व अभियानातंर्गत जिल्ह्यातील अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहे. तब्बल ५३१ किलोमीटरचे पांदण रस्ते मोकळे करण्यात आल्याने ग्रामीण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हे रस्ते मोकळे करण्यात आले आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने हे रस्ते मोकळे करण्यात आले. पांदण रस्ते ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत. अशा पांदण रस्त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी, त्यांना पुनश्च गतिशील करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सुवर्णजयंती राजस्व अभियानात गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित आणि बंद झालेले पांदण रस्ते मोकळे करण्याची योजना अतिशय सफलतापूर्वक राबविण्यात आली. सर्वप्रथम संबंधित तलाठ्यामार्फत अतिक्रमित आणि बंद झालेल्या पांदण रस्त्यांबाबत माहिती संकलित केली. ती माहिती सर्व गावकऱ्यांच्या माहितीसाठी ग्रामपंचायतमध्ये जाहीर करण्यात आली. नंतर अतिक्रमित आणि बंद झालेले पांदण रस्ते मोकळे करून देण्यात आले. या रस्त्यांव्यतिरिक्त जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने पांदन रस्त्यांवर अतिक्रमण आहे. सदर अतिक्रमण हटवून दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)
५३१ किलोमीटरचे पांदण रस्ते झाले मोकळे
By admin | Published: July 12, 2014 11:36 PM