कोरोना संसर्ग येतोय आटोक्यात
सिंदेवाही : एप्रिल महिन्यात कोरोना बाधित यांचा आलेख प्रचंड वाढल्याने शासकीय आणि खासगी शहरातील बेड हाऊस फुल्ल झाल्याचे चित्र होते. कोविड सेंटरमधील बेडची क्षमता शंभर होती. पण आता केवळ ४६ रुग्ण भरती असल्याने ५४ बेड रिकामे आहेत.
एप्रिल महिन्यात तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच उद्रेक तालुक्यात पाहावयास मिळाला. दिवसाकाठी जवळपास ७० ते १०० रुग्णांची भर पडत होती. यामुळे एकाएकी वाढलेल्या रुग्णसंख्येचा फायदा घेत अनेक डॉक्टरांकडून रुग्णांची लूट केली जात होती. चंद्रपूर,नागपूर, गडचिरोली येथील खासगी डॉक्टर उपचाराच्या नावाखाली लूट देखील केल्याचे प्रकार समोर आले होते. प्रशासनाच्या बोर्डवर कोविड सेंटर व रुग्णालय फुल्ल दाखवायचे. मात्र प्रत्यक्षात ज्याच्याकडे पैसा त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचे. मे महिन्यापासून संसर्गाचा वेग मंदावल्याने खासगी डॉक्टरांच्या गोरखधंद्यावर ब्रेक लागला. ज्या कोविड सेंटरमध्ये हाऊस फुल्ल बोर्ड राहायचे, तिथे आता बेड सहज उपलब्ध होत आहे. समाज कल्याण वसतिगृहामध्ये ७० बेड व ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर येथे ३० बेडची व्यवस्था करण्यात आली होती. आता संसर्गाचा धोका कमी होत असल्याने ५४ बेड रिकामे असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.