चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी दहशत अद्यापही कायम आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, ५५ जण नव्याने बाधित झाले आहेत. तर ११३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या ५५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १७, चंद्रपूर तालुका २, बल्लारपूर ७, भद्रावती ३, नागभीड २, मूल ६, पोंभुर्णा २, गोंडपिपरी २, चिमूर १, वरोरा ३, कोरपना १ तसेच जिवतीमध्ये एका रुग्णाची नोंद करण्यात आली तर इतर ठिकाणच्या आठ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, राजुरा या तालुक्यात एकही रुग्ण आढळला नसून, या तालुक्यात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ४६३ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार २२५ झाली आहे. सध्या ७२३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख ३१ हजार १५२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४ लाख ४३ हजार ८८० नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५१५ बाधितांचा मृत्यू झाला आहे.
बाॅक्स
आजचे मृत्यू
मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी तालुक्यातील प्रत्येकी एक तसेच गडचांदूर येथील एका पुरुषाचा समावेश आहे.