- साईनाथ कुचनकार चंद्रपूर - मागील काही वर्षांमध्ये औद्योगिक प्रगती वाढत आहे. त्यामुळे विविध ट्रेडचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची कंपन्यांत कामासाठी मागणी वाढली आहे. प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत, त्यांच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडावी सोबतच कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या हेतूने चंद्रपूर येथील शासकीय आयटीआयने विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. यानुसार आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना विविध कंपन्यांत ४५ दिवसांचे थेट प्रशिक्षण दिले जाणार आहे. यानुसार प्रशिक्षणासाठी चंद्रपूर येथील ५६ मुलींची निवड करण्यात आली असून, पहिली बॅच मंगळवारी सकाळी संभाजीनगर येथे रवाना करण्यात आली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआयच्या अभ्यासक्रमात ४५ दिवसीय ऑन जॉब ट्रेनिंगचा समावेश केला आहे. या अंतर्गत आयटीआयतील विविध व्यवसाय अभ्यासक्रमानुसार विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार प्रशिक्षणार्थ्यांना ४५ दिवसांमध्ये कंपनीत काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची चंद्रपूर येथील प्रशिक्षणार्थी धूत ट्रान्समिशन छत्रपती संभाजीनगर येथे प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे गटनिदेशक सुनील मेश्राम व सर्व शिल्पनिदेशक यांच्या पुढाकाराने प्रशिक्षणासाठी पाठविले आहे.
यावेळी शिल्पनिदेशक प्रमोद भेंडे, अमित काळे, रविकिरण सोरते, योगेश शामकुल, सुशील महाजन, कविता गारे, कांचन कुंटेवार, मंगला खणके, सुनीता डोंगरे, मोनाली मून, रेखा कोहाड, इंदिरा वाभिटकर, प्रिया नागदेवते, मोनाली दारवणकर, सुषमा बोकडे, मेघा जंगम, रावलकर, मामा लोणारे, धोटे, खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.
या ट्रेडच्या विद्यार्थिनींना प्रशिक्षणआयटीआयमधील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, आयसीटीएसएम, कोपा, वीजतंत्री या द्वितीय व्यवसायातील ५६ प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग मिळणार आहे.