कृषिग्राहकांनी थकीत वीजबिल भरावे, यासाठी राज्य सरकारने सवलत धोरण जाहीर केले. यासाठी महावितरणकडून ठिकठिकाणी मेळावे घेणे सुरू आहे. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे हे प्रयत्नशील आहेत. चंद्रपूर मंडळातील चंद्रपूर, वरोरा, गडचिरोली, ब्रह्मपुरी, आलापल्ली आदी सहा विभागातील २९ उपविभाग अंतर्गत जनमित्र, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंत्यांना सोबत घेऊन कृषिपंप विजबिलाची वसुली आणि अकृषक थकबाकी वसुलीबाबत थेट संवाद साधण्यात आला. कृषिपंपधारकांचे मेळावे आयोजित करून वीजबिल भरण्याचे आवाहन केले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे, चिरोली येथील ४४ ग्राहकांनी तीन लाख ६६ हजार तर मनगावातील ३८ ग्राहकांनी दोन लाख ८८ लाख व पिपरी येथे ४९ कृषी ग्राहकांनी ५ लाखांचा भरणा करून थकबाकीमुक्त झाले. यावेळी मुख्य अभियंता देशपांडे, अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, सरपंच मिनल लेनगुरे, अधीक्षक अभियंता प्रादेशिक कार्यालय (प्रकल्प) हरिश गजबे, सरपंच खामनकर, उपसरपंच येरेकर उपस्थित होते. थकबाकी वसुलीत उत्तम काम करणाºया वीज कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
१८ कोटींची ६७ लाखांची सवलत
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ७९ हजार ३०४ कृषिपंप ग्राहकांना २३३ कोटींच्या थकबाकीवर १८ कोटींची ६७ लाखांची सवलत मिळाली. शिवाय, २१ कोटी ३३ लाखांचा विलंब आकार व व्याज मिळून एकत्रितपणे ४० कोटी माफ होणार आहे. १९२ कोटी अशा सुधारीत थकबाकीपैकी निम्मी रक्कम ९६ कोटी कृषिग्राहकांना भरावा लागणार आहे. यातून कृषिग्राहकांचे १३६ कोटी माफ होऊन गाव व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे, असा दावा महावितरणने केला.