साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रवाशांच्या सेवेसाठी असे बीद्र असलेल्या एसटीला आजही सामान्य नागरिकांची पसंती आहे. मात्र, अनेकवेळा तांत्रिक बिघाड, पंक्चर यासारख्या समस्या उद्भवत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षांत चंद्रपूर विभागाअंतर्गत तब्बल ५९० वेळा एसटी रस्त्यात बंद पडली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.खासगी बसेसच्या स्पर्धेमध्ये सुरक्षित प्रवासासाठी आजही मोठ्या प्रमाणात एसटीला प्रवाशांची पसंती आहे. त्यामुळे अडचणीच्या काळातही चंद्रपूर विभागाने बऱ्यापैकी उत्पन्न मिळवून महामंडळाने आपला डोलारा सांभाळला आहे.चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि चिमूर येथे आगार आहे. यासाठी विभागांमध्ये २२५ बसेस आहे. सध्या दररोज १४०५ फेऱ्या केल्या जात असून ८० हजार कि.मी. प्रवास केला जात आहे. चंद्रपूर विभागांतर्गत असलेल्या बसेस दुर्गम तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करीत आहेत. मात्र, मागील वर्षी एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये विविध मार्गांवर तब्बल ५३६ बसेस तांत्रिक कारणासाठी बंद पडल्या. यामध्ये पंक्चर होणे, ब्रेक फेल, सुट्या भागाचे नुकसान यासह अन्य बिघाड झाले आहेत. तर एप्रिल २०२० ते जानेवारी २० पर्यंत ५४ बसेस मार्गामध्ये बंद पडल्या. मागील तसेच यावर्षीचे एसटी बंद पडल्याने प्रमाण जास्त वाटत असले तरी प्रवासाच्या तुलनेत तसेच इतर विभागाच्या मानाने चंद्रपूर भागातील एसटी बंद पडण्याचा प्रमाण कमी असल्याचे चंद्रपूर विभागाचे म्हणणे आहे.सध्या स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी महामंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये नवीने बस खरेदी तसेच शिवशाहीसारख्या बसेस स्पर्धेत उतरविल्या आहेत. एवढेच नाहीतर कोरोनाकाळात संकटाच्या वेळी प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे कामही एसटीने केले आहे. मात्र दुरुस्तीवर होणारा खर्च एसटीला महागात पडत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर महामंडळात १५ आधिकाऱ्यांसह १५६० कर्मचारी विविध विभागात कार्यरत असून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ कऱ्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.
दहा वर्षांवरील २३ बसेसचंद्रपूर विभागाअंतर्गत २२५ बसेस आहेत. नियमानुसार १० ते १२ वर्षांपर्यंत बस प्रवाशांसाठी चालविली जाते. त्यानंतर मालवाहतूक तसेच स्कॅपमध्ये बस काढली जाते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटीकडून विशेष काळजी घेतली जाते. नियमित स्वच्छता तसेच मेन्टेनन्ससुद्धा वेळावेळी केल्या जात असून दक्षता घेतली जात असल्याची माहिती आगारातील सुत्रांकडून मिळाली आहे.
एसटी मेंटेनन्सवर लाखोंचा खर्चचंद्रपूर विभागात असलेल्या एसटीच्या मेन्टनन्सवर वर्षाकाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे. यामध्ये बसेस दुरुस्ती, देखभालीवर हा खर्च होताे. हा खर्च विभागीय कार्यालयाकडून होतो. यासाठी अधिकाऱ्यांची विशेष परवानगी घ्यावी लागते. चेचिस आणि इंजीनवर हा खर्च अधिक होताे.
सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी महामंडळ तत्पर आहे. काहीवेळा प्रवासादरम्यान बस बंद पडली तरीही प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी दुसऱी बस उपलब्ध करून देत सुविधा पुरविल्या जाते.- आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर