सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : पात्र शेतकऱ्यांना मिळणार लाभचंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व पोंभुर्णा तालुक्यातील लक्ष्यांकापेक्षा अतिरिक्त असलेल्या पात्र ६१४ अर्जदार शेतकऱ्यांना सिंचन विहीरींचा लाभ देण्यासाठी लक्ष्यांक वाढवून देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे. नियोजन विभागाच्या ७ जानेवारीच्या पत्रान्वये नागपूरचे विभागीय आयुक्त आणि चंद्रपूरच्या जिल्?हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.नियोजन विभागाच्या ११ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयान्वये ११ हजार सिंचन विहीरींच्या कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्हयास तीन हजार विहिरींचा लक्ष्यांक देण्यात आला होता. चंद्रपूर जिल्हयातील मूल व पोंभुर्णा या तालुक्यातील लक्ष्यांकापेक्षा अतिरिक्त असलेल्या एकूण ६१४ अर्जदारांना सिंचन विहिरींचा लाभ देण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील अर्जदार शेतकऱ्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विहीरींचा लाभ मिळावा पयार्याने सिंचनाची सोय शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी, यादृष्टीने पुढाकार घेत ना. मुनगंटीवार यांनी नागपूरचे विभागीय आयुक्तांना कार्यवाहीचे निर्देश दिले. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे चंद्रपूर जिल्ह्यास सिंचन विहीर योजनेचा लाभ मिळण्यासाठी ३ हजार ६१४ लक्ष्यांक देण्यास नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मूल व पोंभुर्णा या तालुक्यातील ६१४ अर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
मूल व पोंभुर्णात ६१४ अतिरिक्त विहिरी
By admin | Published: January 10, 2017 12:47 AM