रवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते प्रदूषण आज केवळ चिंतनाचाच विषय ठरलेले नाही. या विषयावर चिंतन करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. आता प्रदूषणविरोधातील कायद्याची कडक अंमलबजावणी करून प्रदूषण हद्दपार करण्याची वेळ आली आहे. या प्रदूषणाने केवळ जिल्हावासीयांचे आयुष्य काळेकुट्टच केलेले नाही तर अनेकांच्या आयुष्यालाच संपविले आहे. एप्रिल २०१० पासून आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ६१९ जणांचा मृत्यू श्वसन संस्थेचे आजार, टीबी आणि त्वचा रोगामुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, मागील सहा वर्षात अशा आजारांमुळे जिल्ह्यातील ६१९ जणांचा बळी गेला असला तरी अजूनही हजारोंच्या संख्येत रुग्ण अशाच आजारामुळे बाधित आहेत. चंद्रपूरचे वाढते प्रदूषण आता अगदी टोकापर्यत गेले आहे. मर्यादा केव्हाचीच ओलांडली आहे. त्यामुळे या प्रदूषणावर आळा बसविण्यात आला नाही तर जिल्ह्यातील पुढची पिढी प्रदूषणाचे दुष्परिणाम घेऊनच जन्माला येईल, हे वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही. प्रदूषणामुळे श्वसन संस्थेचे आजार, टीबी, ह्दयरोग, त्वचा रोग आदींची लागण होते, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. लोकमतने या संदर्भात माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता अशा आजाराचे किती रुग्ण आहे आणि किती जणांचा मृत्यू या आजाराने झाला आहे, याची आकडेवारी हाती आली. ही आकडेवारी धक्कादायक आहे. जिल्ह्यात एप्रिल २०१० ते २०१५ पर्यंत तब्बल ४२० जणांचा मृत्यू श्वसन संस्थेचे आजार व टीबीमुळे झाला आहे. जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ पर्यंत १०१ जणांना या आजाराने मृत्यूच्या दाढेत ओढले. जानेवारी १०१६ ते आॅक्टोबर २०१६ पर्यंत ८७ जणांचा याच आजाराने मृत्यू झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रदूषणाशी निगडित आजाराने बळी जात असतानाही संबंधित शासकीय यंत्रणा अद्याप पाहिजे तशी या विषयात काही करू शकली नाही, हे जिल्हावासीयांचे दुर्दैवच.प्रदूषणामुळे श्वसन संस्थेचे अनेक आजार जडतात. दमा, ब्रायकॉयटीस, यू.आर. आय., ए.आर.आय., निमोनिया, टीबी या आजारांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यात नागरिकांना जडलेल्या या आजाराची आरोग्य विभागाची २०१३ ते आॅगस्ट २०१६ पर्यंतची आकडेवारी बघितली तर अनेकांना धक्का बसेल, अशी आहे. राजुरा तालुक्यात ६,०२९ जणांना श्वसन संस्थेशी निगडित आजाराची लागण झाली आहे. मूल तालुक्यात २५, २३५ जणांना, कोरपना तालुक्यात १,२२५ जणांना, चिमूर तालुक्यात ४४,१८७ जणांना, चंद्रपूर तालुक्यात ३४, ६२५ जणांना, बल्लारपूर तालुक्यात १४, २०३ जणांना, भद्रावती तालुक्यात १०,०५८, वरोरा तालुक्यात १८,५३४ जणांना श्वसनाशी संबंधित रोगाची लागण झाली आहे.
सहा वर्षांत ६१९ जणांचा बळी
By admin | Published: June 10, 2017 12:28 AM