राजुरा तालुक्यातील पोवनी येथील विनायक संभाजी साळवे यांचे राजुरा येथील बँक ऑफ इंडिया शाखेत बचत खाते आहे. त्या खात्याचे एटीएम कार्डही त्यांच्याकडे आहे, परंतु १४ सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यातून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चेन्नई येथील एटीएममधून चार हजार रुपये काढल्याचा मेसेज त्यांच्या मोबाइलवर आला. लगेचच चेन्नई येथीलच पी.के. स्टोअरमध्ये ४९ हजार २०० रुपये आणि पुन्हा एका एटीएममधून चार हजार रुपये व पुन्हा दुसऱ्या एटीएममधून चार हजार व पुन्हा तीन हजार रुपये असे एकूण ६४ हजार २०० रुपये खात्यातून काढल्याचे मेसेज आले. हे सर्व मेसेज मोबाइल कव्हरेजमध्ये येताच, एकाच वेळी मिळाल्याने त्यांना काहीच करता आले नाही.
त्यानंतर मात्र, त्यांनी बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन तक्रार केली व पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली. बँक अधिकारी यांनी लगेच एटीएम ब्लॉक केले आहे. मात्र, त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील काय, याकडे लक्ष लागले आहे.