चंद्रपूर : चंद्रपूर शहरात कचरा संकलन करण्याकरिता १९७ घंटागाड्या व १० मोटारगाड्यांची सोय नागरिकांना व व्यावसायिकांना करून देण्यात आली आहे. या घंटागाड्या घरापर्यंत जातात. तरीही अनेक नागरिक व व्यावसायिक कचरा रस्त्यावर टाकतात. यावर बारीक लक्ष ठेवून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या ६६ व्यावसायिकांवर मनपा प्रशासनाने ७ हजार ३०० रूपये दंडाची कारवाई केली.घरापर्यंत घंटागाडी जात असतानाही नागरिक व व्यवसायिक कचरा घंटागाडीला न देता अथवा नेमून दिलेल्या जागी कचरा टाकत नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत झोन क्र. २ (ब) अंतर्गत येणाऱ्या सहा प्रभागातील व्यावसायिकावर प्रभाग शिपायामार्फत बारकाईने नजर ठेवून त्यांची यादी करण्याचे निर्देश प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार यांनी प्रभाग शिपायांना दिले होते. त्यानुसार प्रभाग शिपायांनी त्यांची यादी कार्यालयात सादर केली होती. त्यानुसार ४ जूनपासून स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार, शिपाई प्रल्हाद हजारे, गणेश खोटे, रमेश कोंकुळे, धर्मपाल तागडे, सुधाकर चांदेकर, बंडू मून, दशरथ चांदेकर, राजेश दखने यांनी मोहीम राबवून ६६ कारवाई करून ७ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. अंचलेश्वर, महाकाली, माँ तुळजा भवानी, मातानगर, बाबूपेठ व हिंदुस्थान लालपेठ प्रभाग अंतर्गत येणाऱ्या पानठेला, मांस विक्रेते, मटन विक्रेते, मंच्युरियन, पाणीपुरी, पीठ गिरणी व्यावसायिकांवर ही कारवाई केली. (स्थानिक प्रतिनिधी)
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या ६६ व्यावसायिकांवर कारवाई
By admin | Published: June 15, 2016 1:42 AM