फोटो
भिसी : भिसी नगर पंचायत निर्मितीची २९ डिसेंबरला उद्घोषणा झाल्यानंतर भिसी ग्रामपंचायत निवडणुकीत ६६ उमेदवारांनी आपले भरलेले उमेदवारी फार्म मागे घेणार असल्याचा ठराव सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आला.
मागील अनेक वर्षांपासून भिसी नगरपंचायत निर्माण व्हावी, म्हणून प्रशासन दरबारी प्रयत्न सुरू होते. शासनातर्फे २९ डिसेंबरला शासन निर्णय प्रमाणे उद्घोषणा करण्यात आली. दरम्यानच्या काळात गावातील विविध गटनेत्यांनी व अपक्षांनी आपापले नामांकन अर्ज दाखल केले. गावातील विविध पक्षांतील, तसेच अपक्ष उमेदवार असे एकूण ६६ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता अर्ज भरले असतानाच मध्येच भिसी नगरपंचायतची अधिसूचना शासनाकडून जाहीर झाली. नगरपंचायत की ग्रामपंचायत या संभ्रमावस्थेत उमेदवार आणि गावकरी पडले. त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी व गावविकासाकरिता एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून भिसी येथील सर्व संघटना व टायगर ग्रुप, सर्वक्षीय नेते व गावातील नागरिक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. सर्वपक्षीय बैठकीमध्ये गरिबा निमजे, धनराज मुंगले, जि. प. सदस्य ममता डुकरे, अरविंद रेवतकर, प्रदीप कामडी, पं. स. सदस्य घनश्याम डुकरे, सचिन गाडीवार, गोपीनाथ ठोंबरे, आदी हजर होते.
सर्वपक्षीय बैठकीमध्ये विविध पक्षीय गटनेत्यांनी, तसेच अपक्ष उमेदवारांनी गावविकासाच्या हितासाठी एकत्र येण्याचे अभिवचन दिले. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीकरिता भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची हमी सर्वपक्षीय गटनेत्यांनी दिली. सोमवारी सर्व ६६ उमेदवार आपले नामांकन परत घेणार आहेत. यावेळी भिसी नगरपंचायत संघर्ष समितीसुद्धा तातडीने निर्माण केलेली आहे. त्यामुळे भिसी नगरपंचायत निर्मितीकरिता आता भिसी नगरपंचायत संघर्ष समिती काय भूमिका घेते, याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.