कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आरोग्य विभागातर्फे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम रावविली होती. या मोहिमेंतर्गत कोरोना संशयित व्यक्ती तसेच इतर सहव्याधी (बीपी, शुगर) असणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात दोन टप्प्यांत सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य विभागाची २,२०९ पथके गठित करण्यात आली होती. यामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह आशा आणि अंगणवाडीताई सहभागी झाल्या होत्या. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ६७,२७२ जण विविध सहव्याधीग्रस्त आढळून आले, त्यांना आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेण्यासाठी आरोग्य विभागातर्फे सुचविले तर काहींना मार्गदर्शन करण्यात आले.
बॉक्स
सर्वेक्षणानंतर पुढे काय?
जिल्ह्यात सहव्याधीग्रस्त असलेल्या एकूण ६७,२७२ व्यक्ती आढळून आल्या. यातील १,६९२ जणांना प्रशासनाने तातडीने उपचारासाठी आरोग्य संस्थांकडे पाठविले. यापैकी १,५५८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३७८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्या सर्वांवर उपचार करण्यात आले.
बॉक्स
कोरोनाचे ३७८ तर इलीचे दीड हजार रुग्ण
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात दोन टप्प्यांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कोविडचे २७८ रुग्ण आढळून आले.
सर्वेक्षणात सारीचे ६ तर इलीचे १५०० रुग्ण आढळून आले. या रुग्णांना तातडीने रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. कोविड व सारीव्यतिरिक्त जिल्ह्यात इतर आजारांच्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
बॉक्स
नागभीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात इतर शहरांच्या तुलनेत नागभीड तालुक्यात सर्वाधिक ५,६४४ रुग्ण आढळून आले. यामध्ये इलीचे ३० रुग्ण आढळून आले. त्यानंतर मूल तालुक्यात ५,२४७ जण सहव्याधीग्रस्त आढळून आले.
बॉक्स
एकूण कुटुंब संख्या ५,३२,९०१
किती कुटुंबांचे झाले सर्वेक्षण ५,२४,२१२
सर्वेक्षणासाठीची पथके २,२०९
पथकातील कर्मचारी ३,०००
———
सहव्याधीग्रस्त असलेल्या व्यक्ती
चंद्रपूर ९९०
भद्रावती २,९९८
वरोरा ४,२९८
चिमूर ११२
ब्रह्मपुरी ३,६८४
नागभीड ५,६४४
सिंदेवाही १,९७२
सावली ३०९
मूल ५,२४७
पोंभुर्णा ५१
गोंडपिपरी २६०
बल्लारपूर ९१८
राजुरा १,५९७
कोरपना ५४१
जिवती ५४५