चंद्रपूर : विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या शताब्दी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली. सूर्यांश साहित्य-सांस्कृतिक मंच व सर्वोदय शिक्षण मंडळाच्यावतीने शुक्रवारपासून स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. १६ सत्रांमध्ये रंगणाऱ्या संमेलनासाठी विदर्भातील प्रतिभावंत साहित्यिकांची जणू मांदियाळी राहणार आहे.
संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध विचारवंत व लेखक डॉ. वि. स. जोग भूषवतील. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन् होईल. यावेळी प्रमुख पाहुणे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. फिरदौस मिर्जा, सर्वोदय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सुधा पोटदुखे, माजी आमदार सुदर्शन निमकर, राकेश पटेल उपस्थित होते.
सकाळी ८. ३० वाजता शिवाजी चौक, आझाद बगीचा ते संमेलनस्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. शुक्रवारी पहिल्यादिवशी दुपारी एक वाजता अ. भा. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनात सुनील देशपांडे, चंद्रशेखर वाडेगावकर, वर्षा चौबे, मीनल राेहणकर, संजय डोंगरे सहभागी होतील.
साहित्यापासून मराठी वाचक का दुरावला ?
दुपारी ३. ३० वाजता साहित्य व अवांतर वाचनापासून मराठी वाचक दुरावला आहे का? यावर चर्चासत्र होणार आहे. त्यामध्ये अनिल बोरगमवार, निखिल वाघमारे, ज्योत्स्ना पंडित, संजय साबळे, शेखर देशमुख, डॉ. अनमोल शेंडे सहभागी होणार आहेत. दुपारी ५.३० वाजता जनमानसावर प्रभाव- माध्यमांचा, चित्रपटांचा की राजकारणाचा यावरील चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांच्या अध्यक्षतेत डॉ. मोहिनी मोडक, विष्णू मनोहर, असीम चव्हाण, डॉ. अजय देशपांडे विचार मांडतील.
आज रात्री वैदर्भीय प्रतिभावंतांचे कविसंमेलन
शुक्रवारी रात्री ८ वाजता डॉ. मिर्जा रफी बेग यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन होणार असून, विदर्भातील ४९ प्रतिभावंत निमंत्रित कविंमध्ये संजय इंगळे तिगावकर, उषाकिरण आत्राम, युवराज गंगाराम, पद्मरेखा धनकर, विद्याधर बन्सोड, सुनीता झाडे, ना. गो. थुटे, कुसूम आलाम, विजया मारोतकर, किशोर कवठे, ऋता खापर्डे, मधुरा इंदापवार, देवेंद्र तातोडे, नितीन भट, प्रमोदकुमार अणेराव, मोहन शिरसाट, गिरीश सपाटे, साधना सुरकार, गणेश भाकरे, रवींद्र जवादे, दुषांत निमकर, अक्षय गहुकर, गणेश जनबंधू आदींचा समावेश आहे.