चंद्रपूर : कोबाड गांधी लिखित आणि लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवादीत केलेल्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या पुस्तकाला राज्य शासनाकडून जाहीर झालेला पुरस्कार जीआर काढून अचानक रद्द केल्यानंतर राज्यभरात निषेध होत आहे. या पार्श्वभूमीवर आ. अभिजित वंजारी यांनी ६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात राज्य शासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, याबाबत साहित्यिक गप्प राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लेखिका अनघा लेले यांनी मराठीत अनुवादित केलेल्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' या पुस्तकाला राज्य शासनाकडून जाहीर झालेला पुरस्कार रद्द केल्याने ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुहास पळशीकर यांनी भाषा समिती तसेच लेखिका प्रज्ञा पवार व निरजा यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे व शासनाच्या कला, साहित्य व भाषा विविध समित्यांवरील सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी साहित्य संमेलनातील उद्घाटन सत्रात हा विषय ऐरणीवर आणला आणि राज्य सरकार साहित्य क्षेत्रातील स्वायत्ततेवर घाला घालत असल्याची टीका केली. वर्धा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार यांचे नाव निश्चित असताना अखेरच्याक्षणी वगळण्यात आले. यवतमाळ येथील संमेलनात नयनतारा सहगल यांनाही बोलू दिले नाही, अशी उदाहरणे देऊन आ. वंजारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नागपूरचे विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांनीही संविधानातील तरतुदींचा आधार घेऊन विचार स्वातंत्र्याची भूमिका मांडली. परंतु, उद्घाटन व त्यानंतरच्या दिवसभरातील सत्रांत कोबाड गांधींच्या 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' मराठी अनुवादित पुस्तकाबाबत उद्भवलेल्या विषयावर साहित्यिकांनी गप्प राहणेच पसंत केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.