लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर हा प्रदूषित जिल्हा म्हणून आधीच कुख्यात आहे. आता तर या प्रदूषणाने आपली पातळी ओलांडली आहे. येथील एक पर्यावरण अभ्यासक व दोन डाॅक्टरांनी केलेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणातून चंद्रपुरातील ९२ टक्के नागरिकांचा जीव गुदमरत असल्याचे विदारक वास्तव यातून समोर आले आहे. अशा वातावरणात जगण्यापेक्षा दुसरीकडे जागा मिळाल्यास चंद्रपूर हे शहर सोडून जाण्याची तयारीही तब्बल ७० टक्के लोकांनी या सर्वेक्षणातून दर्शविली आहे. या सर्वेक्षणातील ९० टक्के लोक चंद्रपुरातील आहेत.सर्वेक्षणातून चंद्रपूरकर कसे आरोग्य जगत आहे याचा प्रत्यय येतो. प्रदूषणामुळे अनेक आजार जडले आहे. श्वसनाचे आजार बळावले. इतकेच नव्हे तर प्रत्येक घरातील एकाला तरी हा आजार जडला असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. देशात प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूरकडे बघितले जाते. मर्यादेबाहेर प्रदूषण ओकणारे येथील उद्योग याला सर्वस्वी कारणीभूत ठरत आहे. हे उद्योग किती फायदेशीर आहे. याची समीक्षा करावी लागेल. हे यातून दिसून येते.
चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. यासंदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चंद्रपुरातील प्रदूषणामुळे अनेकांना आजाराचे प्रमाण वाढले आहे. या प्रदूषणावर त्वरित आळा न घातल्यास भविष्यात त्यांचे दुष्परिणाम बघायला मिळणार आहे.- डाॅ. अशोक वासलवार, हृदयरोगतज्ज्ञ, चंद्रपूर
सध्या प्रदूषणाची पातळी ही धोकादायक आहे. यासंदर्भात आता नागरिकांनी स्वत: मत व्यक्त करणे सुरु केले आहे. ६० ते ७० टक्के नागरिकांना विविध आजार जडल्याचे सर्व्हेक्षणात म्हटले आहे. प्रत्येकालाच यामुळे त्रास आहे. भविष्यात यामुळे दुष्परिणाम होऊ नये यासाठी आताच प्रदूषणावर आळा घालणे महत्त्वाचे आहे.- डाॅ. सौरभ राजुरकर, छातीरोगतज्ज्ञ, चंद्रपूर
चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांना काय वाटते, यावर एक सर्वेक्षण करण्यात आले. यात नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. प्रदूषण किती भयावह आहे. हे यातून दिसून आले. त्यावर त्वरित आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- डाॅ. योगेश दूधपचारे, पर्यावरण तज्ज्ञ चंद्रपूर
आरोग्यावर अतिरिक्त खर्च- पर्यावरणी आजारामुळे ७० टक्के लोकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. ४० टक्के लोक किमान दहा हजार रुपये तर २० टक्के लोक वीस हजार रुपये वर्षाला खर्च करतात. - एकूण ६० टक्के लोक अॅलोपॅथी, १३ टक्के लोक होमिओपॅथीला स्वीकारतात. यापैकी ८० टक्के लोक खासगी डाॅक्टरांकडे तर १६ टक्के लोक शासकीय रुग्णालयातून औषध घेतात.- खोकला, गळ्यात दुखणे, खाजवणे आदी रुग्णही वाढले आहे.
हा प्रश्न कोण सोडविणार
- चंद्रपूरच्या प्रदूषणावर मागील अनेक वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू आहे. प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्पपरिणाावर पर्यावरणवादी अधूनमधून आवाज उचलतात. परंतु कालांतराने हा विषय असाच खितपत पडतो. आता पुन्हा प्रदूषणाचे गांभिर्य सांगण्याची गरज नाही. आता यावर शाश्वत उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी केवळ पयर्यावरणवादीच नव्हे, तर प्रत्येक चंद्रपूरकरांनी प्रशासनासह शासनानेही पुढाकार घ्यावा, यासाठी पुढे येण्याची गरज आहे. केवळ आश्वासन ऐकून वेळ मारून नेत राहीली तर हे प्रदूषणरुपी राक्षस चंद्रपूरांचे आयुष्यमान आहे त्यापेक्षाही कमी करेल. याचे परिणाम पिढ्यानपिढ्या भाेगावे लागेल.
पाणीही प्रदूषितचंद्रपूरमध्ये नद्या, तलाव, विहिरी, बोअरवेलचे पाणीही प्रदूषित झालेले आहे. ते पिल्यास आपण आजारी पडू शकतो, असे म्हणणाऱ्यांची संख्या शहरात ८३ टक्के आहे.