राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : १०० वर्षांहून अधिक काळापासून चाललेल्या नागपूर-नागभीड नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून प्रवाससेवा बंद करण्यात आली. १०६ किलोमीटरच्या या ब्रॉडगेजचे बांधकामही सुरू झाले. १ हजार ४०० कोटींच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (एमआरआयडीसी) राज्य शासनाकडे ७२ कोटी ५४ लाखांची मागणी केली. मात्र, या आठवड्यात २२ कोटी ५४ लाखांचाच निधी मंजूर केला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २० महिन्यांची मुदत आहे. पुरेसा निधी मिळाला नाही, तर कामे रेंगाळून प्रकल्प किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागपूर-नागभीड नॅरोगेज पॅसेंजर सेवा १९१३ पासून सुरू होती. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यातील पवनी, लाखांदूर या तालुक्यांतील नागरिकांना नागपूरला जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा आहे. या परिसरातील बदलत्या समस्या, विकासाच्या वाढत्या अपेक्षा, चंद्रपूर व नागपुरातील ऊर्जा प्रकल्प, तसेच कोळसा खाणींमुळे नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याची मागणी पहिल्यांदा १९५२ मध्ये पुढे आली होती. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारचे नागपूर-नागभीड नॅरोगेज या अत्यंत महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाकडे लक्ष वेधले गेले. परिणामी २०१३ मध्ये या नॅरोगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्याचा निर्णय झाला. तत्कालीन राज्य सरकारने ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रकल्पासाठी २३ जानेवारी २०१३ रोजी ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ३० जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार या रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून ६० टक्के कर्ज आणि ४० टक्के समभाग याप्रमाणे राबविण्यास, तसेच प्रकल्पाच्या १ हजार ४०० कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकालाही मान्यता देण्यात आली. मागणीनुसार निधी मिळाला नाही, तर २० महिन्यांत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमीच दिसते. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी एमआरआयडीसी कार्यालयाशी संपर्क साधला, मात्र होऊ शकला नाही.
ब्रॉडगेजसाठी आतापर्यंत मिळालेला निधी
नागपूर-नागभीड ब्रॉडगेजसाठी ४० टक्के समभाग मूल्यातील अर्धा वाटा २८० कोटी राज्य शासन आणि उर्वरित हिस्सा २८० केंद्र सरकारकडून देण्याचे ठरले आहे. राज्य शासनाच्या हिश्श्यातील २८० कोटींपैकी २७ कोटी ४६ लाखांचा निधी २०२०-२१ मध्ये देण्यात आला. एमआरआयडीसीने ११ मे २०२१ रोजी ७२ कोटी ५४ लाखांची मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी २२ कोटी ५४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
असा आहे नागपूर-नागभीड ब्रॉडगेज मार्ग
स्थानके १९
क्राॅसिंग स्टेशन ०६
टर्मिनल ०२
पॅसेंजर हॉल्ट ११
मोठे पूल १०
लहान पूल ९१
प्रकल्प किंमत १ हजार ४०० कोटी
प्रकल्प पूर्णत्व मुदत २० महिने
नागपूर-नागभीड ब्रॉडग्रेज रेल्वे मार्ग विहित कालावधीत पूर्ण व्हावा, यासाठी नियोजनानुसार काम सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारचा हा संयुक्त प्रकल्प असल्याने महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीच्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने निधी दिला पाहिजे. याकडे दुर्लक्ष झाल्यास चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्व ठरणाऱ्या या ब्रॉडग्रेज मार्गाचे काम रेंगाळण्याची भीती आहे.
- संजय गजपुरे, सदस्य, दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे क्षेत्रीय समिती विभाग, नागपूर