चंद्रपूर : नागरिकांच्या चुकीमुळे मुक्या प्राण्यांचे नाहक बळी जात आहे, अशीच घटना बापट नगर परिसरात घडली. एका नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती मृत गायीच्या पोटात प्लास्टिक कचरा अडकल्यामुळे तिचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी केली असता, तिच्या पोटातून तब्बल ७२ किलो प्लास्टिक कचरा काढण्यात आला.
बापटनगर परिसरातील एक गाय तडफडत असल्याची माहिती येथील रहिवासी अकबर खान यांनी प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी दिली. सदस्य घटनास्थळी दाखल झाले. गायीची तडफड अधिकच असल्याने त्वरित औषधोपचार करण्यात आला. शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. मात्र, तिचा मृत्यू झाला. दरम्यान, उत्तरीय तपासणी करण्यात आली असता, तिच्या पोटातून ७२ किलो प्लास्टिक कचरा, तसेच नऊ महिने पूर्ण झालेले मृत पिलू काढण्यात आले. या घटनेमुळे प्यार फाउंडेशनच्या सदस्यांसह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. नागरिकांची चूक मुक्या पाण्यांच्या जीवावत बेतत आहे. त्यामुळे सावध होऊन प्लास्टिक वापर टाळावा, मुक्या प्राण्यांना वाचवावे, असे आवाहन फाउंडेशनच्या सदस्यांनी केले आहे.
पर्यावरण संवर्धनाचे काय?
राज्यात प्लास्टिकबंदी असली, तरी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात या बंदीचा पूर्णत: फज्जा उडाला आहे. बाजार, तसेच इतर सर्वत्र व्यावसायिक ग्राहकांनाप्लास्टिक देत असून, सुविधेसाठी ग्राहक निमूटपणे ते घेऊन जात आहे. मात्र, यामुळे पर्यावरण संवर्धनाचे काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
...तर अन्नत्याग आंदोलन
प्लास्टिकबंदी आहे. मात्र, ही बंदी केवळ कागदावरच आहे. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पशु-पक्ष्यांचा नाहक बळी जात आहे. मुके जनावरे प्लास्टिक खात असून, त्यांचा यामुळे नाहक बळी जात आहे. नागरिक, तसेच प्रशासनाची चूक असतानाही बळी. मात्र, मुक्या जनावरांचा जात आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावावे, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल.
देवेंद्र रापेल्ली, अध्यक्ष प्यार फाउंडेशन, चंद्रपूर
मानवांच्या चुकीमुळे मुक्या जनावरांचा नाहक बळी जात आहे. नागरिकांनी प्लास्टिक वापरू नये, बाहेर फेकू नये. गर्भवती मृत गायीची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यामध्ये तिच्या पोटातून ७२ किलो प्लास्टिक कचरा काढण्यात आला, अशा घटना टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे.
-डाॅ.पी.डी. कडूकर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, विभाग चंद्रपूर