घुग्घुस : गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना नळधारक सर्रासपणे टिल्लू पंपाचा वापर करत असल्याच्या तक्रारीवरून प्रशासक तहसीलदार नीलेश गौड यांच्या आदेशानुसार सोमवारपासून टिल्लू पंप जप्तीची धडक मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ७२ टिल्लू पंप जप्त करण्यात आले आहेत.
गावात पाणीटंचाई बाराही महिने असली, तरी उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवते. या काळात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. दरम्यान, टिल्लू पंप वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सजग नागरिकांनी नगर परिषदेच्या प्रशासकांचे याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी तत्काळ याची दखल घेत टिल्लू पंपधारकांवर कारवाईचे संकेत दिले होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत नागरिक टिल्लू पंप नळाला लावत होते. त्यामुळे स्थानिक पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अमर लाड यांना जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशांप्रमाणे नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने टिल्लू पंप जप्तीची धडक मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात आली. आत्तापर्यंत ७२ टिल्लू पंप जप्त करण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागात कार्यरत हरिभाऊ जोगी, अशोक रसाळ, सचिन चिकणकर, सचिन माशीरकर, महिला कर्मचारी लक्ष्मी येरलावार यांनी ही जप्तीची कारवाई केली.