संवर्ग विकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीराजुरा : भेंडवी ग्रामपंचायतीमध्ये ७४ लाख ५७ हजार २८९ रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार भेंडवीचे उपसरपंच आनंद गेडाम यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. असे असले तरी अजूनपर्यंत कुठलीच कारवाई न झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा आनंद गेडाम यांनी दिला आहे.ग्राम निधी अंतर्गत गाळ काढण्याच्या कामावर एकच मजूर एकाच तारखेस वेगवेगळ्या प्रमाणात काम केल्याचे दर्शवून खोटे दस्तावेज तयार केले. सप्टेंबर महिना ३० दिवसांचा असताना ३१ सप्टेंबर २०१४ ला मजुरी दिल्याचे रोख पुस्तकात दर्शविले आहे. झाडे जीवंत नसताना संगोपनाचे काम केल्याचे खोटे खर्च दर्शवून निधीचा अपहार करणे, गैर कायदेशिर मार्गाने गौण खनिज खरेदीचे खोटे दस्ताऐवज तयार करणे, स्वच्छता फंडातून शौचालय बांधकामाचे खोटे दस्ताऐवज तयार करुन शासकीय रकमेचा अपहार करणे, टँकरद्वारे पाणी पुरवठा न करता खोटे दस्ताऐवज तयार करणे, पासबुकाप्रमाणे कोणतेही दस्ताऐवज तयार न करता खोटे रोख पुस्तक तयार करणे, ग्रामपंचायत गृहकर व पाणीकर वसुलीची रक्कम कचरागाडी, ट्रिगार्ड, सोलर लाईटवर नियमबाह्यरित्या खरेदी केल्याचे दाखवून खोटे अभिलेख तयार करणे, यासारखे अनेक आरोप गेडाम यांंनी तक्रारीत केले आहेत. या ग्रामपंचायतीच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्रामपंचायतीमध्ये ७४ लाखांचा भ्रष्टाचार
By admin | Published: October 07, 2016 1:02 AM