सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त स्थानिक दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने ७५ लाख ७९ हजार ३४० रुपये मंजूर केले आहेत. राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी आपला शब्द पाळला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीने १६ आॅक्टोबर २०१६ रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्यासाठी ७० लाख रुपयांची मागणी केली होती. ना. मुनगंटीवार यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत बांधकामासाठी निधी मंजूर करण्याचा शब्द आपल्या भाषणादरम्यान दिला होता. त्यानुसार, या भवनाच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निधी मंजुरीचा आदेश ८ मार्च रोजी निर्गमित केला आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ आॅक्टोबर १९५६ रोजी स्थानिक दीक्षाभूमीवर तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. या दिवसाची साक्ष म्हणून प्रत्येक वर्षी दीक्षाभूमी येथे १५ व १६ आॅक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव साजरा केला जातो. दीक्षाभूमीला येणाऱ्या अतिथींनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याची आवश्यकता बोलून दाखविली आहे. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमीसाठी ७६ लाखांचा निधी
By admin | Published: March 11, 2017 12:48 AM