लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटाचा फटका महावितरण कंपनीलाही बसला आहे. दरम्यान, अद्यापही काही ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. वीज बिल माफ करण्याच्या मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. मात्र, शासनाने अद्याप तरी कोणताही निर्णय घेतला नाही. या काळात थकीत वीज बिल वसुलीचे मोठे आवाहन महावितरण कंपनीसमोर आहे. यासाठी जनजागृती मोहीम महावितरणने हाती घेतली. दरम्यान, आक्टोबर महिन्यापर्यंत ७७.२६ टक्के वीज बिलांची वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे.जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. २९६ ग्राहक उच्च दाबाच्या विजेचा वापर करतात.चंद्रपूर सर्कलमध्ये बल्लापूर, चंद्रपूर आणि वरोरा विभागाचा समावेश आहे. १ मार्च ते २६ आक्टोबर या दरम्यान लघु दाबाच्या वीज ग्राहकांची थकबाकी ४४९ कोटींवर पोहोचली होती. त्याचा भरणा २७९ कोटी म्हणजे ६३.१४ टक्के होऊ शकला. यामध्ये बल्लारपूर विभाग ५५.६२ टक्के, चंद्रपूर विभाग ६७.८७ टक्के इतका विजभरणा होऊ शकला. आलापल्ली विभाग ५२.६० टक्के, ब्रह्मपुरी विभाग ५८.८१ टक्के आणि गडचिरोली विभागातून ६४.४५ टक्के, इतका भरणा करण्यात आला.
वीज बिल माफ करण्याची मागणी पडली मागेलाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे, २०० युनिटपर्यंत बिलामध्ये सुट द्यावी, आदी मागण्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये करण्यात आल्या होत्या. यासाठी काही राजकीय तसेच सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र सध्या ही मागणी मागे पडली आहे.
मोबाईल संदेशवीज बिल भरण्यासंदर्भात ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. दरम्यान, काही ग्राहकांसोबत थेट संवादही साधण्यात आला. याचा फायदा महावितरणला झाला. सामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत आहे. असे असले तरी वीज कट होईल, ही भीती त्यांना आहे. त्यामुळे उसनवारी करून बील भरण्याचा प्रयत्न ते करीत आहे. ग्रामीण भागातील भरना जास्त आहे.लाॅकडाऊनच्या काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्राहकांना अतिरीक्त वीज बिल आले. त्यातच सर्वच बंद असल्यामुळे बिल भरण्याची समस्या होती. त्यामुळे अनेकांनी वीज बिल थकविले. दरम्यान, काहींनी आनलाईन भरना केला.