चंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी पुन्हा ७८.७९ किमी क्षेत्र अधिग्रहित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हे क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा घटकात सामील होणार आहे. या निर्णयामुळे अंधारी वन्यजीव अभयारण्याचे एकूण क्षेत्र ५०९.२७ वर्ग किमी. झाले आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वनसंपदा आणि वन्यजीवांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. दशकभरात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्याने वन्यजीव व वाघ-बिबट्यांची संख्या वाढली. वन्यजीवांचा अधिवास क्षेत्र वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांही वारंवार घडत आहेत. परिणामी, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी क्षेत्राचे विस्तारीकरण करणे आणि वाढ झालेले क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ७८.७९ वर्ग किमी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभयारण्यातला लागून बफर क्षेत्रातदेखील उत्तम वनाच्छादन आहे. हे क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध असल्याने उत्तर-पूर्व वनक्षेत्रात वाघांचा नेहमी संचार असतो.
चंद्रपूर अभ्यासगटाचा अहवाल सादर
चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-व्याघ्र संघर्षावर उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य शासनाने समिती गठित केली होती. या समितीने शासनाकडे अहवाल सादर केला. त्यावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. यामध्ये चार क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली असून उपाययोजनांसाठी समितीने क्षेत्रनिहाय महत्वाच्या शिफरशी केल्या आहेत. राज्य वन्यजीव कृती आराखडाही यावेळी मंजूर झाला. हा आराखडा १२ प्रकरणात विभाजित करण्यात आला.
दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन, वन्यजीव अवैध व्यापार, वन्यजीवांचे आरोग्य व्यवस्थापन, परिसंस्थेची संवर्धन प्रणाली आदींबाबत महत्त्वाच्या शिफारशी समाविष्ट आहेत. या शिफारशींचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लाभ होणार, असा दावा वन अधिकाऱ्यांनी केला आहे.