चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वन तसेच वनांवर आधारित विविध योजनांची माहिती व्हावी, याचा फायदा विविध राज्यातील वनविभागांना व्हावा यासाठी भारतीय वनसेवेमध्ये नव्याने रूजू झालेल्या ८० परिक्षाधीन अधिकाऱ्यांना वनविभाग प्रशासनाने चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवशीय प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. सदर अधिकारी विविध योजना तसेच वनांचा अभ्यास करण्यासाठी विविध गाव तसेच प्रकल्पांना भेटी देत माहिती जाणून घेत आहेत.
वनाने समृद्ध जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प, वनविकास, वन्यजीव, सामाजिक वनिकरण, वनांवर आधारित विविध योजना, बांबू प्रकल्प यासह जिल्ह्यातील विविध योजना यशस्वीरित्या सुरू आहे. जैवविविधेतही हा जिल्हा आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, मागील सरकारच्या काळामध्ये वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाला वेगळी ओळख निर्माण करून दिली.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी वनांवर आधारित विविध प्रकल्प सुरु केले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची ओळख राज्यातच नाही, तर देशभर झाली आहे. या सर्व बाबींचा सुक्ष्म अभ्यास करण्यासाठी तसेच याचा फायदा इतर राज्यातील वनविभागाला व्हावा यासाठी भारतीय वनसेवेमध्ये नव्याने रुजू झालेल्या ८० अधिकाऱ्यांचे दोन गट तयार करण्यात आले असून सदर अधिकारी ताडोबासह विविध प्रकल्पांना भेटी देत आहे. जिल्ह्यात दाखल झालेल्या या अधिकाऱ्यांना त्या-त्या विभागाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी एक पत्र काढले असून विभागातील विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे.
या प्रकल्पांना अधिकारी देणार भेटी
चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, वेकोलि, विविध ठिकाणचे वृक्षारोपण, बल्लारपूर पेपर मिल, बल्लारपूर लाकूड डेपो, आलापल्ली फॉरेस्ट डिव्हीजन, चिचपल्ली येथील बाबू संसोधन आणि प्रशिक्षण केंद्र, सीएसटीपीएस आदी .