चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीकरिता सुधारित धोरण आखण्यासंदर्भात शिक्षक संघटनांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. जवळपास आठ हजारांवर सूचना पत्र प्राप्त झाले आहेत. त्यातील महत्त्वाच्या सूचना स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती आहे.
आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया प्रथमच २०१७ मध्ये ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. त्यानंतर ७ एप्रिल २०२१ रोजी या धोरणाची अंमलबजावणी करत दोन्ही बदल्यांची प्रक्रिया पार पडली. मात्र, बदली प्रकियेत काही त्रुटी दिसून आल्याने तसेच काही संवर्गाला न्याय मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर पुन्हा सुधारित सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून आदेश करण्यात आले होते.
याकरिता सहा सदस्यीय अभ्यास गट नव्याने यासाठी शासनस्तरावर नेमण्यात आला आहे. या समितीने राज्यातील सर्वच शिक्षक संघटनांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यामुळे राज्यभरातील अनेक संघटनांनी याकरिता निवेदनाद्वारे सूचनादेखील दिल्या आहेत. शिक्षक बदली अभ्यास गटाकडे ८ हजारांवर सूचना, सुधारणा आलेल्या असून, त्या सूचनांची माहिती एकत्रित करण्याचे व वर्गीकरण करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. त्यानंतरच शिक्षक भरतीचे सुधारित धोरण ठरविण्यात येणार आहे.