चंद्रपूर : हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची अंमलबजावणी करण्याकरिता चंद्रपूर शहरात मागील ४ दिवसांत ८२ हजार ८२७ व्यक्तींना डी.ई.सी. गोळ्यांचे वितरण करण्यात आले.
हत्तीरोगाच्या प्रतिबंधाकरिता यावर्षी देखील हत्तीरोग विरोधी तीन प्रकारची औषधे नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये गरोदर माता, दोन वर्षाखालील बालके, अतिगंभीर रुग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष देखरेखीत औषध खाऊ घालण्यात येत आहे. या मोहिमेत मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी सात आरोग्य झोन केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना औषध खाण्यास प्रवृत्त करत आहेत. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना हत्तीरोग दूरीकरणासाठी डी.ई.सी. अलबेंडाझोल आणि आयव्हर्मेक्टिन या गोळ्या दिल्या. त्यांनी गोळ्यांचे सेवन करून मोहिमेचा शुभारंभ केला.
मागील ४ दिवसांत ९९ हजार ७०२ व्यक्तींना भेटी देण्यात आल्या. सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता आरोग्य विभागामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या डी.ई.सी. गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.