चंद्रपूर : २०११ च्या जनगणेनुसार शहराची लोकसंख्या ३ लाख २१ हजार आहे. घरांची संख्या ८२ हजाराहून अधिक झाली. मात्र, अधिकृत नळधारक केवळ सुमारे ३५ हजारच आहेत. शिवाय, तीन कोटीचा पाणीकर थकीत आहे. असेच सुरू राहिल्यास अनधिकृत नळधारकांची संख्या पुन्हा वाढू शकते. त्यामुळे अमृत पाणी पुरवठा योजनेला गती देऊन तात्काळ कार्यान्वित करणे, हाच मनपासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहराची लोकसंख्या दरवर्षी वाढत असल्याने पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे महानगरपालिकेसाठी आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे शासनपुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अॅण्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) ही महत्त्वाकांक्षी योजना तातडीने सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. या योजनेत शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा, मलनि:सारण, नागरी परिवहन पुरवणे, गरिबांसाठी नागरी सुविधांची निर्मिती करून राहणीमानाचा दर्जा सुधारणे, प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा करणे, स्वच्छतेकरिता मलनि:सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्य जलवाहिनीची व्यवस्था या कामाचा समावेश आहे. परंतु, अन्य कामाच्या तुलनेत पाणीपुरवठा योजनेला प्रथम प्राधान्य देण्यासाठी अमृत योजनेला गती देऊन कार्यान्वित करणे हाच चांगला पर्याय आहे. कारण, घरांची संख्या ८२ हजार असली तरी अधिकृत नळधारक केवळ ३५ हजाराच्या जवळपास आहे.
अनधिकृत नळांना आळा
चंद्रपूर शहरातील घरांच्या संख्येत शहरात अधिकृत नळधारकांची संख्या कमी आहे. मात्र, कोणत्याही वॉर्डात अनधिकृत नळ नाहीत, असा दावा महानगरपालिकेने केला आहे. घरी नसलेले अनेक कुटुंब सार्वजनिक नळातील पाणी वापरतात. अमृत योजनेमुळे १०० टक्के घरांमध्ये अधिकृत नळ सुरू होणार आहेत, असेही प्रशासनाचे म्हणणे आहे.
जलवाहिन्यातील अत्यल्प पाणी गळती
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलवाहिन्यांची काही महिन्यापूर्वीच तपासणी व दुरुस्ती करण्यात आली. तपासणीचे काम तर नियमितपणे सुरूच असते. त्यामुळे पाणी गळती अत्यल्प आहे. कुठे समस्या निर्माण झालीच तर लगेच दुरुस्ती केली जाते.
तीन कोटीचा पाणीकर थकीत
नागरिकांनी पाणीकर भरावा, यासाठी मनपाकडून सातत्याने सूचना दिल्या जातात. त्यामुळे कर भरण्यात सामान्य कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत आहे. परंतु, व्यावसायिक श्रेणीतील नळधारकांचे दुर्लक्ष झाले. अशा नळधारकांकडे तीन कोटीचा पाणीकर थकीत आहे.
कोट
अमृत योजनेचे काम झपाट्याने सुरू असल्याने लवकरच पूर्ण होणार आहे. सर्वांना पिण्याचे मुबलक पाणी मिळावे, यासाठी शहरातील प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे अधिकृत नळधारकांची संख्या निश्चितच वाढेल आणि १०० टक्के घरांना नळजोडणी होईल.
- विजय बोरीकर, अभियंता पाणीपुरवठा मनपा, चंद्रपूर