मंगल जीवने लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत हरवलेल्या (१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४) रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), चाइल्ड लाइन व लोहमार्ग पोलिसांच्या सहकार्याने ८६१ मुलांचे त्यांच्या पालकांसोबत पुनर्मिलन घडवून आणले. यात ५८९ मुले व २७२ मुलींचा समावेश आहे.
आरपीएफकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, ते सुटका केलेल्या मुलांसाठी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या मानकीकृत कार्यप्रणालीद्वारे अनिवार्य केलेली जबाबदारी पार पाडत आहेत आणि 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत मुलांची सुटका करण्यासाठी इतर भागधारकांसोबत काम करत आहेत.
बल्लारशाह रेल्वे स्थानकावर असलेल्या चाइल्ड लाइनने आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने घरून पळून आलेली भिक्षेकरी व इतर १२७ बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर केले.
तर मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांवरून एप्रिल २०२४ मध्ये ५६, जूनमध्ये ९३, जुलैमध्ये ९५, ऑगस्टमध्ये २०२, सप्टेंबरमध्ये १४१, ऑक्टोबरमध्ये १६० व नंतर ११४. यामध्ये ५८९ मुले व २७२ मुली अशा एकूण ८६१ मुलांना आरपीएफने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत त्यांच्या पालकांसोबत मनोमिलन घडवून आणले.
असे चालते कार्य गेल्या काही वर्षापासून भांडण किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर, आदींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता घरून पळून मुले रेल्वे स्थानकावर येतात व प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात व जीआरपी पोलिसांकडे सोपवून चाइल्ड लाइनच्या मदतीने त्यांना पालकांकडे सोपवले जाते. या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.
"आजपर्यंत आरपीएफच्या मदतीने अनेक मुलांना त्यांचे आईवडील, नातेवाईक मिळाले आहेत. यात आरपीएफचे भरपूर योगदान आहे." - भास्कर ठाकूर, समन्वयक चाइल्ड लाइन, बल्लारशाह रेल्वे स्थानक.