लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : प्रधानमंत्री सूर्यधर मोफत वीज योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८९१ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज स्वतः तयार करण्यास सुरुवात केली आहे. पर्यायाने ते विजेबाबत जिल्ह्यातील वीज ग्राहक स्वावलंबी झाले आहेत.
केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. सौर प्रकल्पातून ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रती किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॅट पर्यंत मिळते. तीन किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे.
बँकेकडून कर्ज उपलब्ध महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोल नेट मीटर देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रुफटॉप बसविणाऱ्या एजन्सीसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी तत्काळ स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते.
महावितरणच्या योजनांमुळे दिलासा.... महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांसाठी विविध योजना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सौर पंप, तसेच सूर्यघर योजनांसह विविध योजनांमुळे वीज ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. महावितरणच्या योजनांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेले आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते, जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.