चंद्रपूर : राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करणारे लोकप्रतिनिधी बोटावर मोजण्याइतकेच. जागृत नेत्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे जीवनदान मिळते. अशीच संवेदनशीलता दाखवलीय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी. ‘आम्ही ओळखीचेही नसताना तुम्ही देवासारखे धावून आलात’, असे भावनिक पत्र हृदयाला छिद्र असलेल्या एका चिमुकल्याने जीवनदान मिळाल्यानंतर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लिहून आभार मानले.
पारस कमलाकर निमगडे असे या चिमुकल्याचे नाव. आठव्या वर्गात शिकणारा पारस गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रहिवासी आहे. पारस एक दिवस भोवळ येऊन कोसळला. वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी तातडीने हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला पालकांना दिला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये कुठून जमवायचे, या प्रश्नाने कमलाकर निमगडे व त्यांच्या परिवाराच्या समोर यक्ष प्रश्न उभा ठाकला.
ना. मुनगंटीवार यांना ही बाब कळताच त्यांनी सहकाऱ्यांना सांगून सावंगी मेघे येथील रुग्णालयात पारसवर शस्त्रक्रिया केली. संकटकाळी देवासारखे धावून आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचे पारसने एक भावनिक पत्र लिहून आभार मानले.