सावली (चंद्रपूर) : पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला लागून असलेले व्हॉल्व्ह चोरणाऱ्या तीन चोरट्यांना सावली पोलिसांनी बुधवारी अटक केली. चोरट्यांकडून ४५ हजार रुपये किंमतीचे नऊ एअर व्हाॅल्व्ह जप्त केले आहे. ओमप्रकाश पोटे, अंकुश पोटे दोघेही रा. पारडी ता सावली, अजय गोहणे रा. फोकुर्डी ता. चामोर्शी असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर चौथा आरोपी भंगार व्यावसायिकाला सूचना पत्रावर सोडण्यात आले आहे.
सावली तालुक्यातील कवठी, पारडी, रूद्रापूर शेत शिवारातून पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन गेली आहे. या पाईपलाईन जागोजागी व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहे. १२ मार्च ते १ एप्रिल या कालावधीदरम्यान नऊ एअर व्हॉल्व्ह चोरीला गेल्याची तक्रार सावली पोलिसांत केली. पोलिसांनी कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.
ठाणेदार आशिष बोरकर यांनी तपासाची आपली चक्रे फिरवत ओमप्रकाश पोटे, अंकुश पोटे, अजय गोहणे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. भंगार व्यावसायिकाला सुचना पत्र देऊन पोलिसांनी सोडले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी मलिकार्जून इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण मडावी, चंद्रशेखर गंपलवार यांच्यासह सावली पोलिसांनी केली.