लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यासाठी ४५३ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्या उत्तम समन्वयाने जिल्ह्याचा ९९.९६ टक्के निधी खर्च झाला आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार अभिजित वंजारी, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, विशेष निमंत्रित सदस्य तथा विविध विभागाचे विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्हा परिषद ही योजनांची अंमलबजावणी करणारी स्वायत्त संस्था आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्याच्या एकूण तरतुदीच्या ४० टक्के निधी हा जिल्हा परिषदेला दिला जातो. जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत अनेक कामे चालतात. या विभागाच्या कामासंदर्भात काही तक्रारी असल्यास समिती गठित करण्यात येणार आहे. रस्त्याचे बांधकाम होत असताना वाहतुकीस अडथळा व नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. काही कंत्राटदार एजन्सी रस्त्याचे काम पूर्ण करीत नाही, अशावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्याला ४५३ कोटी ९६ लाख प्राप्त सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्याला ४५३ कोटी ९६ लाख रुपये प्राप्त झाले. यामध्ये सर्वसाधारण योजना २९९ कोटी ६२ लाख, आदिवासी उपयोजना ८२ कोटी ३३ लाख तर अनुसूचित जाती उपयोजना ७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी सर्वसाधारण योजनेअंतर्गत खर्च २९८ कोटी ९१ लाख, आदिवासी उपयोजनाअंतर्गत ८२ कोटी ३३ लाख व अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ७१ कोटी ९९ लाख असे एकूण ४५३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च केला.