रवी रणदिवे
चंद्रपूर: अंगी समयसूचकता असली की माणूस कितीही वयाचा असला तरी कोणत्याही संकटावर मात करू शकतो. याची प्रचिती ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे घडलेल्या प्रकारावरून आली.
जंगलात अचानक वाघ समोर आल्याने एका १४ वर्षीय मुलाने चक्क मोबाईल फेकून मारला व वाघ पळाला. या मुलाच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत असून, आवळगावचा गुणवंत परिसरात कीर्तीवंत ठरला आहे. या धाडसी मुलाचे नाव आहे गुणवंत विश्वनाथ लोळे. हा प्रसंग तसा गुरुवारी घडला आहे. मात्र, त्याची आताही परिसरात चर्चा होत आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे महाराष्ट्र विद्यालयात वर्ग नववीमध्ये शिकत असलेला १४ वर्षांचा गुणवंत शाळेला सुटी असल्यामुळे सकाळच्या सुमारास आपल्या घरच्या शेळ्या चारत होता. एका बाजूला शेळ्या चरत होत्या. आपल्या शेळ्यांच्या मागे काही अंतरावर उभा राहून तो मोबाईलवर गाणे लावून ऐकत होता. पहिले लावलेले गाणे संपल्यानंतर दुसरे गाणे लावण्यासाठी खाली मान टाकून सर्च करीत असताना अचानक त्याच्या समोर वाघ येऊन उभा राहिला. दोघांच्याही नजरा एकमेकावर भिडल्या. तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न लावता गाणे सुरू असलेला आपल्या हातातील मोबाईल त्या वाघाला फेकून मारला. मोबाईल वाघाला लागताच वाघ मागे फिरला. मोबाईलवर गाणे सुरूच होते. त्यामुळे शिकार न करताच वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. मुलाने समयसूचकतेने, हिमतीने आपल्या हातातील मोबाईल फेकून मारल्यामुळे त्याचा जीव वाचला.
परिसरात गुणवंताचीच चर्चा
अशा या धैर्यशील गुणवंत लोळे या मुलाचे नशीब बलवत्तर होते म्हणून तो वाघाच्या तावडीतून सुखरूप बचावला. मात्र, त्याने त्या क्षणात दाखविलेल्या धाडसाची परिसरामध्ये चर्चा सुरू आहे. या धैर्यशील बालकाचे गावभर व आजूबाजूच्या परिसरात कौतुक केले जात आहे. गुणवंत वाघ बघून पळाला असता तर निश्चितच वाघाने त्याला पकडले असते; मात्र तो वाघाच्या डोळ्यात नजर टाकून जागीच उभा राहिला.