नीलेश झाडे
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. दोन सख्ख्या जावांमध्ये काट्याची लढत झाली. प्रतिस्पर्ध्याचे जेवण विरोधकांनी चोरले. या घटनांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले. आता निकाल जाहीर झाला. या निकालात एका उमेदवाराला चक्क शून्य मतदान मिळाले. या उमेदवाराने स्वत:चे मतही स्वत:ला दिले नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात सहा नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत गोंडपिपरी शहरात घडलेल्या मनोरंजक घटनांनी जिल्ह्याचे लक्ष वेधले. आता आलेल्या निकालात एका उमेदवाराला शून्य मतदान मिळाले. या उमेदवाराने स्वत:चे मत स्वत:लाच दिले नाही. जितेंद्र इटेकर असे या उमेदवाराचे नाव आहे. वाॅर्ड नंबर दोनमधून एससी प्रवर्गातून इटेकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. इटेकर भाजपाचे कार्यकर्ता आहेत. त्यांनी पक्षाला उमेदवारी मागितली. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने इटेकर अपक्ष म्हणून राजकीय रिंगणात उतरले. मात्र, पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने त्यांनी स्वत:चा प्रचार केला नाही. शून्य मत घेणारे इटेकर जिल्ह्यातील एकमेव उमेदवार ठरले आहेत.
लहान जावेने मारली बाजी
गोंडपिपरी नगर पंचायतीत दोन सख्ख्या जावा एकाच प्रभागातून उभ्या होत्या. दोन्ही भावांनी आपल्या उमेदवार पत्नीला जिंकविण्यासाठी कंबर कसली. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लहान जाऊ शारदा खेमदेव गरपल्लीवार या प्रभाग १५ मध्ये अपक्ष उमेदवार होत्या. याच प्रभागात त्यांच्या मोठ्या जाऊ नीलिमा गरपल्लीवार या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. दोन जावांपैकी कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले होते. या लढतीत शारदा गरपल्लीवार यांनी १७६ मते मिळवीत विजय मिळविला. मात्र, त्यांच्या मोठ्या जाऊबाईंना केवळ १७ मते मिळाली.