भद्रावती (चंद्रपूर) : आयुध निर्माणी वनक्षेत्रात भरकटलेले एक चितळ बुधवारी शहरातील झिंगुजी वाॅर्ड येथील एका घरात शिरल्याने एकच खळबळ उडाली. एक शिरलेच नाही तर सोफ्याजवळ कुटुंबातीलच एक सदस्य असावे, या अविर्भावात ऐटीत बसून राहिले. या घटनेची माहिती वनविभाग तसेच वन्यप्रेमींना मिळताच त्यांनी घटनास्थळी गाठून त्याला व्यवस्थित पकडून वनक्षेत्रात मुक्त केले.
झिंगुजी वाॅर्ड येथील निवासी आशिष वाकडे यांच्या घरी चितळ घरात शिरल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. हे चितळ आयुध निर्माणी वनक्षेत्रातून भरकटत आल्यामुळे शहरात घुसले. त्याचे वय अंदाजे दोन वर्षे आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे यांनी दिली. या चितळाला व्यवस्थित पकडून निसर्गमुक्त नर्सरीत सोडण्यात आले. यावेळी वन्यप्रेमी श्रीपाद भाकरे, अनुप येरणे व वनकर्मचारी उपस्थित होते.