सिंदेवाही (चंद्रपूर) : येथून १२ किमी अंतरावर असलेल्या कच्चेपार परिसरात एक पट्टेदार भुकेला वाघ फिरत आहे. गुरुवारी सायंकाळी वाघाने गुराखी बाबूराव देवतळे यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना उपचाराकरिता नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याच रात्री वाघाने कच्चेपार येथील गोठ्यातील बैलावर हल्ला करून ठार केले. एकाच दिवशी गावात घडलेल्या या दोन घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कच्चेपार हे गाव चहुबाजूने जंगलव्याप्त आहे. गुरुवारी कक्ष क्रमांक १४७ मध्ये गुरेढोरे चारून घरी परतताना गुराखी बाबूराव लक्ष्मण देवतळे (५६) यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनार पुढील उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्याच रात्री कच्चेपार गावातील नरेंद्र नानाजी पिपरे यांच्या घराच्या गोठ्यात बांधून असलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून ठार केले.
या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनाक्रमांची गांभीर्याने दखल घेऊन वनविभागाने तत्काळ वाघाचा बंदोबस्त करावा व आपद्ग्रस्तांना योग्य आर्थिक मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
गोठ्यात बांधलेल्या गायीवर हल्ला; गाठ ठार, वासरू जखमी
भद्रावती तालुक्यातील घोडपेठजवळील मौजा चालबर्डी येथील शेत सर्व्हे नंबर १७८/१ मधील जनावरांच्या गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला. यात एका गायीचा मृत्यू झाला तर एक वासरू जखमी झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.
यात गाय मालकाचे जवळपास १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही गाय गरोदर असल्याचे वनविभागाकडे तक्रारीत नमूद केले आहे. शालिनी खुशाल धानोरकर असे गाय मालकाचे नाव असून, मौजा चालबर्डी शेतशिवारातील गोठ्यात इतर पाळीव प्राण्यांसोबत गायीला बांधून ठेवण्यात आले होते. शुक्रवारच्या पहाटे ३ वाजताच्या सुमारास अचानक एका पट्टेदार वाघाने गोठ्यात प्रवेश करून त्यांच्या गायीवर हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. एका वासरावरही वाघाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची तक्रार भद्रावतीच्या वन परिक्षेत्र कार्यालयात केली आहे. वन विभागाने पंचनामा केला असून, वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.