राजेश भाेजेकर / आशिष देरकर
गडचांदूर (चंद्रपूर) :चंद्रपूर जिल्ह्यासाठी उद्योग हे वरदान असल्याचे वरवर वाटत असले तरी वास्तविकता अभिशाप वाटणारी आहे. जिल्ह्यात मोठ्या उद्योगांमध्ये सिमेंट उद्योगांचा समावेश आहे. जागतिक पातळीवर सर्वकाही आलबेल दिसणाऱ्या या उद्योगांच्या प्रदूषणाचे वादळ घुग्घूससह गडचांदूर शहरावर घोंगावत आहे.
गडचांदूर हे नगरपालिका असलेले शहर चंद्रपूरपासून दक्षिणेस सुमारे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे शहर म्हणजे ‘सिमेंट उद्योगांचे हब’ आहे. अंबुजा, माणिकगड हे उद्योग गडचांदूरला लागून तर अल्ट्राटेक आणि दालमिया हे उद्योग या शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर आहेत. या उद्योगांमुळे होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे या परिसरातील हजारोंच्या संख्येतील जनता कमालीची त्रस्त आहेत. मात्र त्यांची हाक ना जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळापर्यंत पोहोचत नाही. राज्य शासन तर दूरच राहिले.
गडचांदूरसह परिसरातील गावांवर दिवसभर प्रदूषणाचे धुके पसरलेले असते. यामुळे श्वास घेताना गुदमरल्यासारखे वाटते. या उद्योगांतून रोज शेकडो ट्रक ये-जा करतात. यामुळेही प्रदूषणात भरच पडत आहे. मात्र याचे सोयरसुतक कोणत्याही संबंधित शासकीय यंत्रणेला नाही. या प्रदूषणाविरोधात गडचांदूरातील जनतेने कृती समिती स्थापन करून हजारो लोकांनी स्वाक्षरीनिशी निवेदन सादर केले होते. अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष भेट देऊन माणिकगढ सिमेंट उद्योगामुळे होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली असता धक्कादायक बाब उजेडात आली. या या उद्योगाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसांत उत्तर सादर करण्याचेही बजावले आहे. आता ही कंपनी काय उपाययोजना करते हे बघण्यासारखे आहे.
याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अतुल सातफडे यांनीही माणिकगढ सिमेंट कंपनीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याची बाब प्रत्यक्ष पाहणीत आढळून आली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सात दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
धूर, धुके अन् प्रदूषण
- दिवसभर रस्त्याने धूळ उडत असते.
- कंपनीकडे बघितल्यास आकाशात धुके पसरलेले दिसते. पलीकडे काहीच दिसत नाही. गडचांदूर शहरापासून काहीच अंतरावर राजुरा मार्गावर कंपनीचा लोहमार्ग आहे. येथे ट्रकच्या रांगा लागलेल्या असतात.
- एक जबाबदार पोलीस अधिकारी म्हणतो, आम्ही या शहरातील प्रदूषणामुळे त्रस्त आहोत.
- सुसाट ट्रक्समुळे अनेकांचा अपघाती बळी, किरकोळ अपघात नेहमीचेच.