चंद्रपूर : रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात पार्किंगमध्ये लोळणाऱ्या उमंग नीलकंठ दहिवले (३२, रा. महाकाली नगरी, देवाडा) याचा मृत्यू झाला झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही तपासले असता त्या तरुणाच्या शरीरावरून एकापाठोपाठ एक अशी दोन चारचाकी वाहने गेल्याचे समोर आले. पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांवर कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. प्रतीक बालाजी वाभीटकर (२९, रा. गुरुनानक नगर भद्रावती), जितेश गोपाल विरानी (३८, रा. बापटनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन्ही चारचाकी वाहने शहर पोलिसांनी जप्त केली आहेत.
उमंगचा मित्र रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरातील एका बारमध्ये काम करतो. शनिवारी त्याचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी करण्याच्या अनुषंगाने उमंग चंद्रपुरात आला. त्या दोघांनी यथेच्छ दारू प्यायली. उमंग दारूच्या नशेत बारबाहेर पडला. परंतु, त्याला जास्त दारू झाल्याने तो रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरातील पार्किंग परिसरात झोपी गेला. दरम्यान, इंडिगा विस्टा एमएच ३४ - एम ४३१६ या क्रमाकांच्या वाहनाने तो चिरडला गेला. त्यानंतर ऑडी एमएच ४६ - पी २४७७ या वाहनानेही त्याला चिरडल्याचे सीसीटीव्हीमध्ये समोर आले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी इंडिका विस्टा कारचालक प्रतीक वाभीटकर व ऑडी चालक जितेश वीरानी या दोघांवर कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री त्यांना अटक केली. ही कारवाई शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अतुल स्थूल, सुरेंद्र खनके, दर्शना फुलझेले आदींनी केली. पुढील तपास एपीआय स्थूल करीत आहेत.
सीसीटीव्हीने अपघात आला समोर
उमंगच्या मित्राला उमंग मद्यधुंद अवस्थेत बारबाहेरील पार्किंगमध्ये पडलेला दिसताच त्याने त्याला त्याच अवस्थेत ऑटोत टाकून घरी सोडून दिले. उमंग कसलीच हालचाल करीत नसल्याने कुटुंबीयांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लगेच तेथील सीसीटीव्ही तपासले असता, अपघात झाल्याचे समोर आले.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
सीसीटीव्हीमध्ये त्या युवकाला चिरडल्याचे समोर आलेल्या चारचाकी वाहनांच्या दोन्ही चालकांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. त्यानंतर सोमवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायधीशांनी दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.