चिमूर (चंद्रपूर) : येथील इंदिरानगरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मजुराला १९ हजार ८४० रुपयांचे वीजबिल आल्याने महावितरणचा सावळा गोंधळ समोर आला आहे. याची तक्रार दोन वेळा करूनही महावितरणचे अधिकारी चौकशी करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
चिमूर येथील इंदिरानगर येथील रहिवासी अल्ताफ अहेमद अब्दुल सत्तार कुरेशी या रोजमजुरी करून झोपडीच्या घरात वास्तव्य करीत आहेत. त्यांना तब्बल १९ हजार ८४० रुपयांचे वीजबिल आले आहे. त्यांच्या टिनाच्या घरात बल्ब आणि एका पंख्याशिवाय अन्य एकही विद्युत उपकरण नाही, तरीही महावितरणने १२५३ युनिट दाखवून पाठवलेले वीजबिल पाहून विद्युत ग्राहकास धक्काच बसला. यावरून महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
यासंदर्भाने विद्युत ग्राहक अल्ताफ अहेमद अब्दुल सत्तार कुरेशी यांनी १७ एप्रिल २०२३ व ८ मे २०२३ रोजी मीटर फॉल्टी असून योग्य चौकशी करून तत्काळ मीटर बदलवून देण्यासंदर्भात दोन वेळा अर्ज केला. आठ ते दहा दिवस चकरा माराव्या लागल्या. परंतु महावितरण अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.