मूल (चंद्रपूर) : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले. मूल तालुक्यातील भादुर्णी मारोडा बीट नं. १ कक्ष क्रमांक ७८२ येथे रविवारी सकाळी घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
खुशाल गोविंदा सोनुले (५४) रा. भादुर्णी असे मृताचे नाव आहे. ते तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेले होते. परत येताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते जागीच ठार झाले. ते बराच वेळापर्यंत घरी परत न आल्याने गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वनविभागाचे अधिकारी व गावकऱ्यांनी जंगलात शोध घेतला. परंतु रात्र झाली तरी त्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे सोमवारी सकाळीच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. नायगमकर, क्षेत्र सहायक पाकेवार, वनरक्षक वडे, पारडे, उईके व गावकऱ्यांनी मिळून शोध घेतला असता मारोडा बीट क्र. १ कक्ष क्रमांक ७८२ मध्ये त्यांचा मृतदेह छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वनविभागाकडून खुशालच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
तालुक्यात वाघाचा १२ वा बळी
मूल तालुक्यात आजपर्यंत वाघाने ११ बळी घेतले आहेत. खुशाल हा १२ बळी ठरलेला आहे. दिवसेंदिवस मानव - वन्यजीव संघर्ष वाढलेला असून यावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिक विरुद्ध वनविभाग वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
भरदिवसा वाघाचे हल्ले होत असल्याने शेतकरी शेतात जाण्याकरिता घाबरत आहेत. दिवसेंदिवस शेतकऱ्यांना आपल्या शेतीची मशागत करणे कठीण होताना दिसत आहे. वनविभागाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आहे.