चंद्रपूर: महिलांवर अन्याय, अत्याचार झाल्यास महिला आयोगाकडून दखल घेऊन न्याय दिला जातो. मात्र पुरुषांवर असे प्रकार झाल्यास त्यांच्या पाठीशी कुणीही उभे राहत नाही. त्यामुळे महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करावा, या मागणीला घेऊन चंद्रपूरमध्ये भारतीय परिवार बचाव संघटनेने लढा सुरु केला आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देऊन ही मागणी रेटून धरली आहे.
पुरुष आयोग स्थापन करावा या मागणीसाठी भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय पवार यांना निवेदन दिले आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, मोहन जीवतोडे, वसंत भलमे, प्रदीप गोविंदवार, सुदर्शन नैताम, कायदेशीर सल्लागार ॲड. नितीन घाटकीने, ॲड. सारिका संदुरकर, ॲड. चंद्रशेखर भोयर, ॲड. धीरज ठवसे, सचिन बरबटकर, डॉ. राहुल विधाते, शीतल साळवे, गंगाधर गुरनुले, पिंटू मून, प्रशांत मडावी, मोहब्बत खान, नितीन चांदेकर, अमोल कांबळे, स्वप्नील गावंडे, स्वप्निल सूत्रपवार आदी उपस्थित होते.
सामाजिक बदनामी होईल, या भीतीने पुरुष मंडळी आपल्यावरील अन्याय सहन करीत आहे. प्रत्येक वेळीच पुरुषच गुन्हेगार राहू शकत नाही. अनेकवेळा अधिकाराचा फायदा घेत काही महिला पुरुषांना फसविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पुरुष आयोग स्थापन करून पुरुष मंडळींना न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे. यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. -डॉ. नंदकिशोर मैंदळकर, जिल्हाध्यक्ष, भारतीय पुरुष बचाव संघटना, चंद्रपूर