चंद्रपूर : दुचाकीला कट मारण्याच्या वादातून एका अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ रेल्वे फाटकजवळील सुनसान परिसरात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
आरोपींनी दगडाने ठेचून चेहरा छिन्न विच्छिन्न केल्यामुळे मृताची ओळख अद्यापही पटली नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, एकजण फरार असल्याची माहिती आहे.
पोलीस सुत्राच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा शनिवारी रात्री दुचाकीने घराकडे जात होता. दरम्यान, त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने कट मारली. यातून झालेल्या वादातून चार जणांनी त्याला मारहाण केली.
निर्मनुष्य ठिकाणी नेऊन दगडाने केली हत्या
त्यानंतर त्याला बाबूपेठ रेल्वे फाटक जवळील सुनसान परिसरात नेऊन दगडाने ठेचून त्याची हत्या केली. अत्यंत क्रूरपणे त्याच्या चेहरा दगडाने ठेचल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
हत्येचे मूळ कारण वेगळेच
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी दुचाकीला कट मारल्याच्या कारणातून हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, हत्येचे मूळ कारण वेगळेच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.