चंद्रपूर : पायदळ जाणाऱ्याला रस्त्यात अडवून खिशातून रोख रक्कम, मोबाइल व इतर साहित्य पळविल्याची घटना शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानक चौकात घडली. याबाबत फिर्यादीने तक्रार करताच रामनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासात चोरट्यांचा तपास लावून चार जणांना अटक केली. विशेष म्हणजे यात एका युवतीचा समावेश आहे. विजय ऊर्फ पप्पू मनीष शेट्टी (१९), शुभम सुधाकर रामटेके (२५) दोघेही रा. श्यामनगर आंबेडकर चौक चंद्रपूर, दीपक राजू भोले (१९) रा. शांतीनगर बंगाली कॅम्प चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून रोख रक्कम, पाँवर बॅंक, चोरीदरम्यान वापरलेले वाहन क्र. (एमएच ३१ एफके २६६५), मोबाईल चार्जर असा एकूण ५४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जयदीप दवणे हे आपल्या भावाच्या लग्नापत्रिका वाटण्यासाठी अकोला येथे गेले होते. २६ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता ते बसने पाण्याची टाकी परिसरात उतरले. पायदळ ते बसस्थानकाकडे जात असताना बसस्थानक चौकात ग्रे रंगाच्या ज्युपीटर मोपेडने तीन युवक व एक युवती यांनी त्यांचा रस्ता अडविला. त्यांना वाहनावर बसण्यास सांगितले. तसेच त्यांच्या खिशातून रोख आठ हजार रुपये, मोबाइल, पॉवर बॅंक, चार्जर असा नऊ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिस्कावून पसार झाले.
याबाबतची तक्रार दवणे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात २७ एप्रिल रोजी केली. दरम्यान, रामनगर पोलिस स्टेशनमधील गुन्ह शोध पथकाने २४ तासात चारही चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम, पॉवर बँक, चोरीदरम्यान वापरलेले वाहन, मोबाईल चार्जर असा एकूण ५४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राजेश मुळे, ठाणेदार लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पीएसआय विनोद भुरले, पीएसआय मधुकर सामलवार, प्रशांत शेंदरे, विनोद यादव, किशोर वैरागडे, मिलिंद दोडके, नीलेश मुडे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जुमनाके आदींनी केली.