बाळूभाऊंच्या अंत्यदर्शनासाठी वरोऱ्यात उलटला जनसागर !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 11:48 AM2023-06-01T11:48:37+5:302023-06-01T11:49:43+5:30
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : ‘बाळूभाऊ अमर रहे’ च्या घोषणांनी अखेरचा निरोप
वरोरा (चंद्रपूर) : अल्प राजकीय कारकीर्दीत कर्तृत्वाची मुद्रा उमटवून काळाच्या पडद्याआड गेलेले महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना ‘बाळूभाऊ अमर रहे’ च्या घोषणांनी बुधवारी अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी वरोऱ्यात जनसागर उलटला. रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे नागरिकांना घरांच्या छतावर उभे राहून अंत्यदर्शन घ्यावे लागले.
शहरातील अभ्यंकर वार्डातील निवासस्थानातून हार फुलांनी सजविलेल्या ट्रकवर बाळू धानोरकर यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू पाझरत होते. अंत्ययात्रा दुपारी १२ वाजता वणी-नाका परिसरातील स्मशानभूमीत पोहोचली. पोलिस दलातर्फे शोकप्रसंगीचे बिगुल वाजवून व हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर बाळू धानोरकर यांचा थोरला मुलगा मानस याने आपल्या पित्याला भडाग्नी दिला.
पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज धानोरकर परिवाराकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी ‘बाळूभाऊ अमर रहे’ च्या घोषणांनी शहर दणाणले. दुपारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर अन्न व औषध मंत्री संजय राठोड यांनी सायंकाळी वरोरा येथे धानोरकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, रामू तिवारी, प्रकाश देवतळे, देवराव भोंगळे आदींसह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण केले. अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रतिभाताई म्हणाल्या, चंद्रपूरच्या ढाण्या वाघाला मानाचा मुजरा !
शोकसभेत दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, बाळू धानोरकर यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली. चंद्रपूरच्या या ढाण्या वाघाला व दिलदार व्यक्तिमत्त्व आणि लढवय्या नेत्याला माझा मानाचा मुजरा, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
शोकाकुल धानोरकर कुटुंबीय
अंत्यविधी झाल्यानंतर बाळू धानोरकर यांच्या मातोश्री वत्सला धानोरकर, बहीण अनिता बोबडे, जावई अनिल बोबडे, मोठे बंधू अनिल धानोरकर, त्यांच्या पत्नी, मुले व बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, मुलगा मानस व पार्थ आदी सर्व अत्यंत खिन्न मनाने स्मशानभूमीत एकत्र बसले होते.
नाना पटाेले यांनी दिला पार्थिवाला खांदा
अंत्ययात्रा निघाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही अंतरापर्यंत बाळू धानोरकर यांच्या पार्थिवाला खांदा दिला. याशिवाय वरोरावासी, आप्तेष्ट व चाहत्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या पार्थिवाला खांदा दिला.
स्मृतिप्रित्यर्थ लावली चंदनाची रोपटी
अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमी परिसरात हरित मित्र परिवाराच्या वतीने चंदनाची रोपटी लावण्यात आली. बाळूभाऊंच्या स्मरणार्थ लावलेल्या या रोपट्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.
क्षणचित्रे
- वरोरा शहर कडकडीत बंद
- छतांवर उभे राहून घेतले अंत्यदर्शन
- स्मशानभूमीत रेकॉर्डब्रेक गर्दी
- गर्दीमुळे स्मशानभूमीची जागा अपुरी
- नगर परिषदेकडून स्मशानभूमीत व्यवस्था
- स्फूर्ती परिवाराने केले पाणी वाटप
- पोलिस जवानांचा चाेख बंदोबस्त
- सर्व पार्किंग फुल्ल, सद्भावना चौकात रोखली वाहने
- स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते सकाळपासून बंद
- सुरक्षा भिंतीवरून नागरिक स्मशानभूमीत
- शहरात सर्वत्र श्रद्धांजलीचे फलक